लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव अंतिम टप्प्यात असून लवकरच घोषणा होईल– माजी मंत्री कपिल पाटील
डोंबिवली:- लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे,याची कार्यवाही केंद्रात अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होईल, अशी ग्वाही माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे दिली.
या मागणीसाठी मुंबई,नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांतील लाखो प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांनी अनेक आंदोलने केली.या आंदोलनामुळे राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर केला आणि तो राज्य सरकारने पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला.हा ठराव केंद्राकडे गेल्यानंतर सर्व पक्षीय कृती समितीतर्फे केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनाही निवेदन देऊन या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला त्यामुळे आता त्या ठरावाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच दि.बां.च्या नावाची घोषणा होईल,असे त्यांनी सांगितले.
लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीतर्फे डोंबिवली येथील प्रगती काॅलेजच्या सभागृहात प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांची सभा आयोजित करण्यात आली होती.त्या सभेत मार्गदर्शन करताना कपिल पाटील बोलत होते.
प्रारंभी अखिल आगरी समाज परिषदेचे मुखपत्र असलेल्या आगरी दर्पण मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या सभेला उपस्थित असलेले माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगितले की, दोनच दिवसांपूर्वी मी दिल्लीला जाऊन यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना भेटून आलो.हा ठराव पंतप्रधान कार्यालयात गेला असून लवकरच घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले.

यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी विमानतळ सुरू होण्यापूर्वी नाव लागेल,असा विश्वास व्यक्त केला.त्यानी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या नोकर्यांविषयी माहिती दिली.माजी मंत्री जगन्नाथ पाटील,जगदीश गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या सभेला आमदार राजेश मोरे, माजी आमदार सुभाष भोईर, स्थायी समितीचे अध्यक्ष दीपेश म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे,सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, कृती समितीचे खजिनदार जे.डी.तांडेल, सरचिटणीस दीपक म्हात्रे, अतुल पाटील,गायक जगदीश पाटील,शरद म्हात्रे,दीपक पाटील व अनेक माजी आमदार ,ठाणे, डोंबिवली, कल्याण महापालिकेचे अनेक नगरसेवक रायगड, पालघर, मुंबई, नवी मुंबईतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या आंदोलनाचा आढावा घेतला.व केंद्रीय मंत्र्यांना भेटून त्याचा पाठपुरावा केल्यानंतर अजूनही हा प्रश्न तसाच रेंगाळत आहे,आता त्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.शिवाय आंदोलकांवर घातलेल्या केसेसही मागे घेण्यात याव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या सभेत मान्यवरांच्या भाषणानंतर आंदोलनात भाग घेतलेल्या आंदोलकांचा दि.बा.योद्धा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शेवटी कृती समितीचे खजिनदार जे.डी.तांडेल यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलऩ़ यांनी केले.


















