*उपमुख्यमंत्री अजितदादांच्या संवेदनशील निर्णयामुळे रोहयो मजुरांची होळी आनंददायी होण्याचा मार्ग खुला*
*पालघरमधील ४ हजार रोहयो मजुरांना थकबाकीची रक्कम होळीपूर्वी तात्काळ वितरीत करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश*
मुंबई, दि. ११ मार्च – पालघर जिल्ह्याच्या वाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी योजनेवरील ४ हजार मजुर थकीत मजूरीची रक्कम मिळावी म्हणून तहसिल कार्यालयासमोर सकाळपासून थांबून असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेऊन संबंधित मजुरांना त्यांची ४५ कोटींची थकबाकी होळी सणापूर्वी तात्काळ वितरीत करण्यात येईल, अशी घोषणा केली. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेने हातावर पोट असलेल्या रोजगार हमी मजुरांची होळी आनंदात साजरी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वसई-विरार मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे यांनी पालघर जिल्ह्याच्या वाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी योजनेवरील ४ हजार मजुरांना त्यांची मजूरी मिळाली नसल्याचे आणि त्यासाठी ते संबंधित तहसिल कार्यालयासमोर सकाळपासून जमले असल्याची माहिती सभागृहाला दिली. या मजुरांना थकीत मजूरीची रक्कम तात्काळ मिळावी, ही मागणी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे त्यांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा मुद्दा अत्यंत संवेदनशीलतेने घेऊन संबंधीत मजूरांसाठी ४५ कोटी रुपये तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश दिले. रोजगार हमी विभागाला २२० कोटी रुपये नुकतेच वितरीत करण्यात आले असून त्यातून ही रक्कम तात्काळ दिली जाईल. त्यामुळे संबंधित मजुरांना होळी आनंदात साजरी करण्यात अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या संवेदनशीलतेने रोजगार हमी योजनेच्या ४ हजार मजुरांची होळी आनंददायी होणार आहे.

















