Home पुणे साहित्य हे केवळ सौंदर्याची प्रशंसा करणारे न राहता स्त्रियांच्या संघर्षांची, आत्मनिर्भरतेची आणि...

साहित्य हे केवळ सौंदर्याची प्रशंसा करणारे न राहता स्त्रियांच्या संघर्षांची, आत्मनिर्भरतेची आणि परिवर्तनाच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीची जाणीव करून देणारे असले पाहिजे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

210
0

*विश्व मराठी संमेलन २०२५ : मराठी भाषा आणि स्त्री साहित्यावर विशेष परिसंवाद संपन्न*

पुणे, दि. २ फेब्रुवारी २०२५ : तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप उत्साहात पार पडला. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी *”मराठी भाषा आणि स्त्री साहित्य”* या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या मुख्य सचिव श्रीमती अश्विनी भिडे, आणि लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या मार्गदर्शनाखाली हा परिसंवाद पार पडला. परिसंवादाचे निवेदन उत्तरा मोने यांनी केले. परिसंवादात स्त्री साहित्यातील महत्त्वाचे प्रवाह, भाषेच्या जडणघडणीत महिलांचे योगदान आणि बदलत्या सामाजिक संदर्भात स्त्री लेखनाची भूमिका या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले.

*स्त्री साहित्याचा प्रवास आणि योगदान*

याप्रसंगी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्री साहित्याच्या परिवर्तनाबाबत बोलताना सांगितले की, “पूर्वी स्त्रीचे लिखाण फक्त भावनात्मक स्वरूपाचे होते. मात्र, आजची स्त्री स्वतःचे मत व्यक्त करत आहे, बंडखोरी करत आहे आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत आहे.”

त्यांनी पुढे नमूद केले की, स्त्री आणि पुरुष जेव्हा लेखन करतात, तेव्हा ते समाजातील वास्तव मांडत असतात. साहित्य हे केवळ सौंदर्याची प्रशंसा करणारे न राहता स्त्रियांच्या संघर्षांची, आत्मनिर्भरतेची आणि परिवर्तनाच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीची जाणीव करून देणारे असले पाहिजे.

*स्त्री साहित्याचा बदलता दृष्टिकोन*

लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी स्त्री साहित्यातील बदलांचा उल्लेख करताना सांगितले की, आजची स्त्री आत्मनिर्भर होत आहे, स्वतःला सिद्ध करत आहे आणि समाजात आपले स्थान निर्माण करत आहे. त्यांनी सांगितले की, यापूर्वी स्त्रीच्या भूमिका घरापुरत्या मर्यादित होत्या, मात्र आता त्या प्रशासन, कुटुंब, प्रेम, समाज आणि व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहेत.

श्रीमती अश्विनी भिडे यांनीही स्त्री साहित्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकत सांगितले की, स्त्री लेखन केवळ भावना मांडणारे नसून, ते सामाजिक वास्तव आणि सशक्तीकरणाचा महत्त्वाचा भाग बनले आहे.

*स्त्री साहित्यातील भविष्यदृष्टी*

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढे सांगितले की, स्त्री साहित्याची व्याख्या आता केवळ प्रेमकथांपुरती सीमित राहिलेली नाही. बदलत्या काळात स्त्रीने स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत ती पुरुषप्रधान व्यवस्थेला प्रश्न विचारत आहे.

त्यांनी स्त्री लेखिकांच्या संघर्षाविषयी बोलताना नमूद केले की, स्त्री लेखनाला सुरुवातीला समाजाकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता, मात्र आज ते बदलत आहे. आधुनिक काळात स्त्रियांनी निर्भीडपणे लिखाण करणे आवश्यक आहे.

परिसंवादाच्या समारोपात स्त्री साहित्यातील वाढत्या प्रभावावर चर्चा झाली आणि मराठी भाषेच्या समृद्धतेसाठी स्त्री लेखिकांचे योगदान अपरिहार्य असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here