राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांना घेराव – विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा तीव्र होणार
मुंबई, सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025
महाराष्ट्रातील तरुणाईच्या भविष्याशी खेळ करण्याचे महायुती सरकारचे धोरण उघड झाले आहे. राज्यसेवा 2022 परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला असला तरी, अद्याप 623 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असून, त्यांच्या भविष्यावर घोर अन्याय होत आहे.
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता पूर्णतः हरवली असून, गलथान कारभार, अवैध हस्तक्षेप आणि निष्क्रियतेने विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष, अॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली लोकसेवा आयोगाच्या सचिवांना घेराव घालण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
अॅड. अमोल मातेले यांचे विधान:
“राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणं थांबवलं पाहिजे. 623 उमेदवारांची नियुक्ती रखडवून सरकारने आपल्या बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. आम्ही सरकारला आणि लोकसेवा आयोगाला स्पष्ट इशारा देत आहोत – विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आमचा लढा तीव्र होईल. जर वेळेत निर्णय घेतला गेला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल.”
विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने 623 अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारातील पारदर्शकता सुनिश्चित करावी. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक तणावाला कारणीभूत ठरणाऱ्या गोंधळाला पूर्णविराम द्यावा.
या घेराव आंदोलनामधून राष्ट्रवादी युवक काँग्रेस विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून, सरकारच्या बेजबाबदार कारभाराला जाब विचारणार आहे.
—
राष्ट्रवादी युवक काँग्रेस – तरुणाईचा आवाज, न्यायासाठी लढा!

















