कोल्हापूर लईच भारी …मतदानात मारली बाजी
*विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का; करवीर मतदारसंघात सर्वाधिक मतदान*
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श आचारसंहिता लागू होऊन २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४करिता मतदान झाले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मागील सुमारे ३० वर्षामध्ये या वर्षी सर्वांधिक ६६.०५ टक्के मतदान झाले. मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत सुमारे ५टक्के वाढ झाली आहे. या वाढत्या मतदान टक्केवारीस राज्यातील मतदार हा नक्कीच अभिनंदनास पात्र ठरला आहे.
यावर्षीच्या निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता मतदार यादीतील नोंदीत महिलांमध्ये करवीर, चिमूर, ब्रम्हपूरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ तसेच पळुस-कडेगाव या मतदारसंघांत महिलांचा सहभाग सर्वांधिक दिसून येतो.
महाराष्ट्र राज्याच्या २८८ मतदारसंघाकरिता राज्यात एकूण 9 कोटी ७० लाख २५ हजार ११९मतदार आहेत. यात ५ कोटी २२ हजार ७३९ पुरूष मतदार, ४ कोटी ७९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार तर ६ हजार १०१ इतर मतदार म्हणून नोंदीत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केलेले ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदार आहेत. यात प्रत्यक्ष मतदानात ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६लाख ४९ हजार ३१८ महिला तर १ हजार ८२० इतर मतदारांनी सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावला.
२८८ मतदारसंघाचा मतदानाचा ताळेबंद पाहता, यावर्षी सर्वांधित मतदान हे करवीर मतदारसंघात म्हणजे ८४.९६ टक्के मतदान झाले तर सर्वांधिक कमी मतदान हे कुलाबा या मतदारसंघात झाले. कुलाबा या मतदारसंघात ४४.४४ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
000






















