पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
मला माहित होतं तुम्हा तिकडे करमणार नाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
फलटणमध्ये तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही- खा. अमोल कोल्हे
कोळकी, फलटण
लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना लाडकी बहिण आठवली, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी पक्ष प्रवेशादरम्यार मार्गदर्शन करताना म्हटले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शरद पवार साहेब यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला आहे.
यावेळी शरद पवार साहेब म्हणाले की, आपल्याला महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा करायचा आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना लाडकी बहिण आठवली आहे. मागे आलो होते तेव्हा काहीतरी चुकतंय का? असे कार्यकर्ते यांच्याकडून बघून वाटत होतं. मी अनेक सभा घेतल्या, मला डोळ्यात बघून कळतं. आज तुमचे डोळे प्रफुल्लित आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेला आलो होतो तेव्हा डोळ्यात घाबरट होती. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे. महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी चळवळ झाली त्यामध्ये फलटण अग्रेसर होते. हरिभाऊ निंबाळकर आमदार झाले. कारण महाराष्ट्राला मराठी भाषिकांचे राज्य हवं होतं. यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पद मिळावं, याचा काँग्रेसचा ठराव फलटणमधील मनमोहन पॅलेस येथे झाला. त्यामुळे महाराष्ट्र उभा करण्यामध्ये फलटणकरांचे योगदान मोठं हे कुणी विसरू शकत नाही.असे शरद पवार साहेब म्हणाले.
फडणवीस यांच्या हातात सत्ता होती तेव्हा बहीण दिसली नाही. स्वतःच्या बहिणीबद्दल आस्था असतेच. मागे कधी बहीण आठवली नाही. पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता होती तेव्हा बहीण दिसली नाही. लोकसभेला जेव्हा पराभव झाला तेव्हा बहिण आठवली. बारामतीकर लय हुशार आहेत. तिथे एक बहीण उभी होती. प्रचाराला गेलो की लोक गप्प बसायचे. इतक्या वर्षाचे संबंध होते, जीवाभावाचे होते. पण बारामतीकरांना मताच्या स्वरूपात बहिणीला पाठिंबा दिला.असेही शरद पवार साहेब यांनी बोलताना म्हटले आहे.
पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, मला साठ वर्षात एक दिवस पण तुम्ही सुट्टी दिली नाही. मला चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राचा चेहरा बदलायची माझी नैतिक जबाबदारी आहे. आज चुकीच्या हातात सत्ता आहे. आज महाराष्ट्र कुठे ना कुठे अत्याचार होत आहे. शाळेत लहान मुलीवर अत्याचार झाला, काल एका माजी मंत्र्यांची हत्या झाली. सामान्य माणूस आणि आया बहिणींना सुरक्षिततेने जगता येत नाही. ज्यांचे हात बरबटले आहेत त्यांच्या हातात सत्ता आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन झाला आठ महिन्यात पुतळा खाली आला. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्याचा अनावरण केलं साठ वर्ष होऊन गेली तरी त्याला काही झालं नाही. तुम्ही काही काळजी करू नका आपल्याला लांब जायचं आहे. या तुतारीने संबंध देशात आवाज आल्याशिवाय राहणार नाही. असे शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.
*मला माहित होतं तुम्हा तिकडे करमणार नाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील*
तुम्ही स्वगृही येत आहात तुमचं स्वागत. मला माहित होतं तुम्हा तिकडे करमणार नाही. आता योग्य ठिकाणी आपला राम जायला लागला आहे. राम कधी दिसत नाही, तसा राम आज आपल्याला मंचावर दिसत नाही, पण तो आहे. रामराजे यांच्याशिवाय आम्हाला करमत नव्हतं. तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो, आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघात तुतारी वाजण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे. संजीव राजे आणि दिपक चव्हाण यांच्या हातात तुतारी देतोय. मला माहिती आहे की, इथे काय अन्याय झाला आहे. पोलीस ठाण्याचा वापर किती टोकाचा झाला आहे. विधानसभा निवडणुका 3 ते 4 दिवसात जाहीर होतील. फक्त फलटण नाही मानखटावची जागा पण तुम्ही निवडून आणा असं आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थितीत कार्यकर्त्यांना केलं.
*फलटणमध्ये तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही- खा. अमोल कोल्हे*
याआधी फलटणला जेव्हा यायचो तेव्हा इथे तुतारी वाजलीच पाहिजे असे वाटायचे. पण अखेर आज योग आला. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी निर्णय घेतला. दीपक चव्हाण आज पक्षात प्रवेश करत आहेत. आता फलटणमध्ये तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
आतापर्यंत तेल, बिस्किट, साखर विकत घेता यायची. परंतु आमदार खरेदी करता येतात, हे भाजपने दाखवून दिले. आमदारांना ईडी सीबीआय सारख्या संस्थाचा धाक दाखवून यांनी आपल्या लोकांना पक्षात घेतले. पण महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने दिल्लीसमोर गुडघे टेकणं बस्स झालं असे म्हणत ताठ मानेने निर्णय घेण्याचे ठरवले आहे. इकडे हरियाणासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. राज्यात आपली महाविकास आघाडीच जिंकेल, असेही अमोल कोल्हे म्हणाले.





















