बॅनर बाजीमुळे, परिसर, चौक नाके बकाल… पालिकेचे दुर्लक्ष….
कांदिवली वार्ताहर
अनिल चासकर
मुंबापुरीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, थाटात साजरा होत असताना, राजकीय पक्ष, मंडळे, हौशी आणि इच्छुक उमेदवार आदींनी प्रसिद्धी मिळविण्यासाठी बॅनर बाजी करून परिसर विद्रुप केला आहे. चौक,नाके, सिग्नल, वृक्ष, दृतगती मार्ग, स्काय वॉक, विद्युत दिवे, मेट्रो स्टेशन चे पिलर, उद्यानाच्या लोखंडी जाळ्या आणि सुशोभिकरण केलेल्या चौकात बॅनर बाजी केली आहे. याकडे वाहतूक विभाग, मेट्रो व्यवस्थापन आणि पालिकेने दुर्लक्ष केल्याने प्रवासी, वाहनचालक आणि नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी,सार्वजनिक मंडळांनी रस्त्यावर शुभेच्छा व स्वागताच्या कमानी उभारल्या आहेत. विनापरवाना बॅनरबाजी करणाऱ्या राजकारण्यांनी चौकाचौकात अनधिकृत शुभेच्छांचे बॅनर उभारले आहेत. विशेष म्हणजे सिग्नल, सुशोभिकरण केलेले चौक, दिशादर्शक फलकावरही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर बाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण कमालीचे वाढले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. पण पालिकेचे अधिकारी मात्र अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येते. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बॅनर लावण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. पण मुंबईतील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, मंडळे, हौशी, इच्छुक आणि स्वतः च्या नावाचा गवगवा करणाऱ्यांनी पालिकेची परवानगी न घेताच शहरभर अनधिकृतपणे बॅनर बाजी करून परिसर विद्रुप केला आहे.
गणेशोत्सवच्या नावाखाली राजकीय पुढाऱ्यांनी विकासकांनी एक महिन्यांपासून नाकानाक्यावर जाहिरात केली आहे.पालिकेने विना परवानगी लावण्यात आलेल्या बॅनर वर कठोर कारवाई करावी तसेच सिग्नल, नाके , वृक्ष आणि सुशोभिकरण केलेले चौक बॅनर मुक्त करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून केली जात आहे.






















