Home मुंबई लोकप्रिय समाजसेवक ‘दलितमित्र’ राजा जाधव यांच्या चरित्रग्रंथाचे ‘ग्रंथाली’ प्रकाशनातर्फे १७ ऑगस्ट, शनिवारी...

लोकप्रिय समाजसेवक ‘दलितमित्र’ राजा जाधव यांच्या चरित्रग्रंथाचे ‘ग्रंथाली’ प्रकाशनातर्फे १७ ऑगस्ट, शनिवारी प्रकाशन

178
0

नालासोपारा
नालासोपारा येथील ‘दलितमित्र’ पुरस्कार प्राप्त, दानशूर समाजसेवक आणि प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक श्री. राजा जाधव यांच्या जीवनावरील ‘दादर ते दादर’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन ‘ग्रंथाली’तर्फे शनिवार दिनांक १७ ऑगस्टला निको हॉल, वडाळा, मुंबई येथे संपन्न होणार आहे.‌ लेखक दादासाहेब दापोलीकर यांनी या चरित्र ग्रंथाचे लेखन केलेले आहे.

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू‌ डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार असून प्रसिद्ध साहित्यिक श्री सुमेध वडावाला (रिसबूड) हे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शूर्पारक पत्तन या नावाने प्राचीन काळी ओळखल्या जाणाऱ्या एकेकाळी ‘अपरांतक’ (म्हणजे कोकण) प्रांताची राजधानी असणाऱ्या नालासोपाऱ्यातील ‘दादर’ या प्राचीन भागात जन्माला आलेले राजाभाऊ हे त्या परिसरातील शिवसेनेची धडाडणारी तोफ आहेत.

व्यावहारिक मापदंडांनुसार विशेष शिक्षण न घेतलेले राजाभाऊ लहानपणी कपडे, तांदूळ, टोप्या, फटाके असे छोटे मोठे व्यवसाय करीत असत. नंतर दुकानदारी केली, रिक्षा देखील चालवली. त्यासोबत अंगभूत क्रिकेटकौशल्यामुळे त्यांनी रिझर्व बँकेत शिपायाची नोक‌री मिळवली. अत्यंत वळणदार, घाटदार आणि सुरेख हस्ताक्षराच्या बळावर त्यांच्या अनेक मोठ्या माणसांच्या ओळखी झाल्या. विलक्षण धैर्य, व्यवसायकौशल्य, लोकसंग्रहकला यांच्या आधारे राजाभाऊंनी आपल्या तीन बंधूंच्या सहाय्याने कालांतराने बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायाचं मोठं साम्राज्य उभं केलं.

शिवसेनेच्या माध्यमातून पक्षकारण आणि आपला व्यवसाय करत असतानाच त्यांनी बहुजनांची असलेली आपली नाळ केवळ कायम ठेवली असे नव्हे तर ती दिवसेंदिवस मजबूत केली.
गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, आदिवासी पाड्यांवर सर्व प्रकारचे सहकार्य, अपघातग्रस्तांना मदत अशाप्रकारे राजाभाऊंनी आजन्म समाजसेवा केली. पुस्तके आणि पुरातन वस्तू यांचं प्रचंड वेड असलेल्या राजाभाऊंनी देशाच्या सर्व भागातून अनेक पुरातन वस्तू आणि पुस्तके जमवून त्यांचे एक अतिशय समृद्ध असं संग्रहालय नालासोपारा येथे उभे केले आहे.

बाळासाहेब ठाकरेंवरील असीम निष्ठेमुळे पदाची लालसा न बाळगता सच्चा शिवसैनिक म्हणून काम करताना बाळासाहेब, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आनंद दिघे, मनोहर जोशी आणि शिवसेनेमधील तसेच शिवसेने बाहेरील नेत्यांशीसुद्धा राजाभाऊंनी ऋणानुबंध प्रस्थापित केले. १९९७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या हस्ते मिळालेला ‘दलितमित्र’ पुरस्कार त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे, असे त्यांचे मत आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या राजा जाधव यांची ही अनोखी, विस्मयकारक जीवनगाथा तरुण पिढ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे मत ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here