Home मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

158
0

आज नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे

१) मी माझ्या नवनिर्माण यात्रेचा पहिला टप्पा मराठवाड्यापासून सुरु केला, जो टप्पा मी आज छत्रपती संभाजीनगरला पूर्ण केला. मी माझा दौरा आवरता घेतला अशा बातम्या माध्यमांमध्ये वाचल्या. मी कुठला दौरा आवरता घेतला? मी माझ्या दौऱ्यातील गॅप्स कमी केल्या, काही ठिकाणी मुक्काम होता, तो मुक्काम न करता पुढच्या ठिकाणी पोहचलो आणि तिथे बैठका घेतल्या इतकंच.

२) सोलापूरच्या पत्रकार परिषदेत मी जे बोललो जे सगळ्यानी ऐकलं, पण त्याच्या नंतर ज्या बातम्या केल्या गेल्या त्या जाणीवपूर्वक होत्या म्हणजे राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठाकरे विरुद्ध मराठा अशा वाट्टेल त्या बातम्या केल्या.  मी २००६ ला पक्ष स्थापनेपासून सांगत आलो आहे की आरक्षण जे आहे ते आर्थिक निकषांवर दिलं पाहिजे. आणि त्याउपर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरंतर आरक्षणाची गरज नाही.  कारण इथे रोजगार, शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत की त्या जर आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींना मिळतील असं बघितलं तर आरक्षणाची मग ते शिक्षण असो की नोकरी यांत आरक्षणाची गरजच पडणार नाही.

३) आर्थिकदृष्ट्या मागासलेल्याना आरक्षण द्यावं पण आपल्याकडे जातींना आरक्षण दिलं जातं आणि मग स्वतःच्या राजकारणासाठी जातींचा वापर केला जातो. जरांगे पाटील यांचा खरंतर माझ्या दौऱ्याशी काहीच संबंध नव्हता, पण जरांगेच्या आंदोलनाचा वापर करून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी यांनी राजकारण केलं आणि यातला दुर्दैवाचा भाग म्हणजे मराठवाड्यातील काही पत्रकार ज्यांची नावं मला माहित आहे, त्यातल्या कोणी कशी काँट्रॅक्टस घेतली, कशा गाड्या घेतल्या  हे सगळं मला माहित आहे. मी धाराशिवला असताना मला भेटायला लोकं आले होतं त्यांना भडकवायचं काम पत्रकरांनी केलं. मी जेंव्हा वर या म्हणलं तेंव्हा त्यांना खाली घेऊन जाणारे पत्रकार होते…

४) मग पुढे मी जेंव्हा निदर्शन करणाऱ्यांशी बोललो तेंव्हा त्यातल्या दोन जणांचे फोटो शरद पवारांसोबतचे होते. ते फोटो जुने होते असं त्यांचं म्हणणं आहे . तुतारीसोबतचे फोटो जुने कसे असतील? आणि २ जणं उद्धव ठाकरे गटाचे होते. परवा मी नांदेडला होतो तेंव्हा गेस्टहाऊसच्या बाहेर जे घोषणा देत होते त्यांचे फोटो पण शरद पवारांसोबतचे आहेत. काल बीडमध्ये जे झालं त्यात शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होता.

५) लोकसभेच्या निकालांनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना वाटत आहे की त्यांना मराठवाड्यात भरघोस मतदान जे झालं ते या दोघांकडे बघून झालं, या दोघांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे जे मतदान झालं ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातील मतदान झालं. मुस्लिम समाजाने देशभर मोदींच्या विरोधात मतदान इथे किंवा देशभर झालं किंवा दलित बांधवांना संविधान बदलणार असं वाटलं आणि त्यांनी मोदींच्या विरोधात जे मतदान केलं त्यातून हे घडलं आहे. आणि मी मागच्या पत्रकार परिषदेत बोललो तसं संविधान बदलणार हे भाजपचे काही लोकं बोलले आणि त्यातून नरेटिव्ह तयार झालं. आणि त्यांना विधानसभेला पण अशीच खेळी करावीशी वाटली.

६) काल निदर्शनं करणाऱ्या उद्धव गटाच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या लोकांनी चांगला चोप दिला आणि तो जाताना ओरडत गेला की एक मराठा लाख मराठा. म्हणजे काय यांना जरांगेच्या आंदोलनाच्या आड स्वतःच विधानसभेचं राजकारण करायच आहे.

७) शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होईल… पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूर होऊ नये म्हणून प्रयत्न करायचा तर हेच मणिपूर होईल म्हणत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी यांना खासकरून मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत.

८) शरद पवारांचं राजकारण जाती-जातीत द्वेष निर्माण करणं हेच आहे आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सुरु आहे.

९) यांनी माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या माझं जर मोहोळ उठलं ना तर याना एकही सभा घेता येणार नाही. यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये. मी मागे म्हणलं होतं यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्यामागे विस्थापित आहेत. माझी पोरं काय करतील यांना कळणार पण नाही

१०) २००२ किंवा २००३ असेल मला आठवतंय मराठा आरक्षण हवं म्हणून मोर्चा आला होता. जिथे व्यासपीठावर मोर्चा अडवला गेला तिकडे सर्वपक्षीय होते आणि तिथे सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं…  मग गेल्या इतक्या वर्षात का नाही मिळालं ? मोदी ज्या शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आले असं मोदीच सांगत आहेत, ते गेले १० वर्ष केंद्रात बहुमतात होते मग त्यांनी आरक्षण का नाही दिलं? उद्धव ठाकरे केंद्रात आणि राज्यात ५ वर्ष नांदत होते मग तेंव्हा त्यांनी मराठा आरक्षणाचा आग्रह का नाही धरला? जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या मागून यांचं विधानसभेचं राजकारण सुरु आहे.

११) महाराष्ट्रात जातीचं राजकारण पसरलं नाही पाहिजे ही भूमिका शरद पवारांनी घ्यायला नको का ? उलट तेच हातभार लावत आहेत… म्हणून माझी महाराष्ट्रातील सगळ्या जातीतील लोकांना माझी विनंती आहे की यांच्या नादी लागू नका, यांच्या घाणेरड्या राजकारणाला थारा देऊ नका. अन्यथा पुढे जे महाराष्ट्राचं होईल त्याचा विचार पण नाही करवत.

१२) महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये रिक्षा टॅक्सीचे लाखो परवाने दिले गेलेत पण त्याची माहिती मराठी मुलांना नाही पण इतर प्रांतातून येणाऱ्यांना आहे. असे परवाने निघणार आहे हे मराठी मुलांना कळलं असतं तर त्यांना रोजगार मिळाला नसता का ? हे महाराष्ट्र सरकारचं काम नाही का आपल्या मुलांना कळवावं म्हणून ?

१३) आज महाराष्ट्रात इतक्या शैक्षणिक संस्था आहेत त्याचे मालक कोण आहेत ? मराठा समाजाचेच आहेत ना ? आणि त्याच समाजातील लाखो मुलं शिक्षणापासून वंचित आहेत? या शिक्षण सम्राटांनी सत्तेच्या जोरावर साम्राज्य उभं केलं त्यांना प्रश्न कोण विचारणार ?

१४) माझी पत्रकारांना पण विनंती आहे की तुमच्यातले जातींचं राजकारण करणारे जे पत्रकार आहेत त्यांना तुम्ही दूर सारलं पाहिजे; कालच्या बीड प्रकरणात तीन पत्रकार सापडलेत .. ही कोणती पत्रकारिता आहे ?

१५) माझा लौकरच विदर्भ दौरा सुरु होत आहे, बघू कोण विघ्न आणतय ते…  त्यांचं विघ्न त्यांच्याच गळ्यात घालू….

१६) माझं आरक्षणावरचं विधान हे पत्रकारांना समजलं नाही. राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध किंवा राज ठाकरे विरुद्ध मराठा हे काही पत्रकारांनीच केलं ना ? किंवा त्यांनी कोणाच्यातरी सांगण्यावरून केलं हे किमान आता उघड झालं.

१७) आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रत्येकाला वर आणलं पाहिजे ही माझी इच्छा आहे. मी शरद पवारांची मुलाखत घेतली त्यात मी त्यांना आर्थिक निकषांवर आरक्षण, यांवर विचारलं तेंव्हा ते त्यांनी पण हीच भूमिका घेतली होती, ती मुलाखत काढून बघा. आरक्षणाची गरज कोणाला आहे हे तपासायला हवं की नको…

१८) सगळ्या पक्षांनी अगदी भाजपनेआरक्षणाच्या राजकारणाचा वापर केला. पण लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जे जातीचं विष पसरवायला सुरुवात केली आहे ते भीषण आहे.

१९) मी महायुतीत कसं जाऊ? आधीच तीन लोकांची कंपनी आहे..  त्यांना त्यांचेच स्टेक्स माहित नाहीत मी चौथा जाऊन काय करू ?

२०) जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु असताना पण तिथे मी जाऊन बोललो होतो ना, की आरक्षण हा तांत्रिक मुद्दा आहे आणि फक्त महाराष्ट्राचा नाही तर देशातील अनेक राज्यांचा प्रश्न आहे…

२१) माझी समाजाला विनंती आहे की समाजात विष पसरवणाऱ्याना थारा देऊ नका. तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या की यांच्यासाठी विषय संपला.

२२) संजय राऊत हे शरद पवारांच्या अमंगल कार्यातील करवली आहेत. ती करवली आयुष्यभर पवारांच्या उंबरठ्यावर बसून त्यांचे उंबरठे झिजवणार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here