Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *नाट्य निरंतर* *‘रंगमंच आणि रंगभाषा’ : संवाद तंत्रज्ञांशी* ~ *आभास आनंद*

*नाट्य निरंतर* *‘रंगमंच आणि रंगभाषा’ : संवाद तंत्रज्ञांशी* ~ *आभास आनंद*

61
0

*नाट्य निरंतर*
*‘रंगमंच आणि रंगभाषा’ : संवाद तंत्रज्ञांशी*
~ *आभास आनंद*

‘मराठी नाटक समूह’, ‘अभिषेक थिएटर्स’ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या समन्वयाने, जागतिक मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर सुरू झालेला, ‘नाट्य निरंतर’ हा मराठी नाटक- संकल्पना ते सादरीकरण एक निरंतर प्रक्रिया असा आढावा घेणारा कार्यक्रम, आता सुदृढ होत आहे. उपक्रमाचा प्रत्येक भाग निश्चित उद्दिष्ट ठेवून आणि त्यातून प्रेक्षकांना मिळू शकणाऱ्या नाट्यभानाचे मूल्य निश्चित ठरवून केला जातो. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम हा रंगप्रेमी प्रेक्षकांना महत्त्वाचे काहीतरी देऊन जातो.
६ व्या भागाचा विषय होता ‘रंगमंच आणि रंगभाषा’.

नाटकाची कल्पना, रचनेच्या प्रक्रियेतून जाऊन, जेव्हा चांगले नाटक लिहिले जाते, तेव्हा नाटककार लेखक हा त्या रंगभाषेची जाण आणि भान असलेला, पहिला रंगकर्मी असतो. त्यामुळे लेखकापासून ही प्रक्रिया सुरू होते, दिग्दर्शकापर्यंत ती पोहोचते, आणि नटांकरवी प्रेक्षकांसमोर येते. पण या प्रक्रियेमध्ये मूल्यवर्धन करत जाणारे जे तांत्रिक घटक असतात, त्यांची जाण प्रेक्षकांना फारशी असत नाही. कशाला, ही जाण आणि भान, नाटककार लेखक यांनाही अनेकदा पूर्णपणे असत नाही. या रंगभाषेचे सर्जक, निर्मिती कलाकार, यांच्या तोंडून, नाटकातील मूल्यवर्धन, त्या मागचे सर्जन आणि दृष्टिकोन, यांचे भान प्रेक्षक आणि रंगकर्मी, यांना व्हावे, हा या मागील उद्देश आहे.

तो हेतू साध्य होताना दिसला, कारण या ६ व्या सत्रासाठी निवडलेले तंत्रज्ञ कलाकार, हे त्यांच्या क्षेत्रातील उत्तम आहेत हे सिद्ध झालेले आहे. संदेश बेंद्रे ( नेपथ्यकार), अमोघ फडके ( प्रकाश योजनाकार), मिलिंद जोशी (पार्श्व संगीतकार), नीरजा पटवर्धन ( वेशभूषाकार) आणि उलेश खंदारे (रंगभूषाकार) ही नावे आता रंगकर्मी आणि प्रेक्षकांना चांगली परिचित आहेत. त्यांचे कर्तृत्व उत्तम आणि विविधांगी आहे. असे कलाकार जेव्हा आपला अनुभव कथन करतात, तेव्हा प्रेक्षकांमध्ये निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ या सर्वांची उपस्थिती अभिप्रेत होती. ज्याला रंगभाषा नीटपणे समजून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हा फाइव्ह कोर्स डिनर, एकत्रित मिळण्याचा योग होता. ज्यांच्या लक्षात हे आले, असे निर्माते, दिग्दर्शक कार्यक्रमाला आवर्जून हजर होते. काही तंत्रज्ञही होते. हा उपक्रम आणि त्याचे महत्त्व, रंगकर्मीपर्यंत जास्त प्रमाणात पोहोचवायला हवे.

अशा प्रकारच्या चर्चासत्रात, कलाकारांना बोलते करणारा समन्वयक फार महत्त्वाचा असतो. चर्चासत्राची गाडी रुळावर ठेवणे, आणि प्रेक्षकांना कार्यक्रमाचा एकसंघ अनुभव देणे, हे सर्वस्वी समन्वयकाच्या नियंत्रणावर अवलंबून असते. यात थोडे दुर्लक्ष झाले तर चर्चा भरकटते आणि त्यातून महत्त्वाचे समजून घेणे, बाजूला पडते. या कार्यक्रमाचे समन्वयक, नीरज शिरवईकर यांनी हे काम उत्तम साधले, याचे कारण ते स्वतः एक नाट्य लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ आहेत. त्यामुळे चर्चा आशयापासून भरकटली नाही.

संहितेचा नाट्य लेखक ते निर्माता/ दिग्दर्शक ते कलाकार असा प्रवास होताना, या प्रोसेसच्या सुरुवातीलाच, नेपथ्यकार त्यात सामील होतो, त्याच्या जोडीनेच वेशभूषाकार यायला हवा, इतके या तंत्रांचे एकमेकांना पूरक असणे जरुरी आहे. हा समन्वय नसेल तर ते मारकही ठरू शकते. हे दोन्ही कलाकार आपल्यासमोर, लेखकाची आणि दिग्दर्शकाची मिळून एक दृष्टी जी कलाकृती मागे असते, तिचे निश्चित दृश्यरुप ठरवतात. संहिता ते नेपथ्य रचना. हे नेपथ्यकाराचे आणि संहितेचा विषय, काळ आणि पात्रविशेष हे वेशभूषा निश्चित करते. थोडक्यात नेपथ्यकार आणि वेशभूषाकार यांत समन्वय हवा. संहितेच्या मागणीनुसार दिग्दर्शक पात्र निवड करतो. थोडक्यात या तिन्ही प्रक्रिया संहितेला मध्यवर्ती ठेवून होतात, व्हायला हव्यात.

प्रकाश योजना आणि पार्श्वसंगीत, हे या प्रक्रियेच्या शेवटी येतात. तरीही त्यांचे संहितेतील योगदान, मूल्यवर्धन महत्वाचे. प्रकाशयोजनाकाराला नेपथ्य आणि वेशभूषा याचे भान ठेवून लाइट डिझाइन करावे लागते. थोडक्यात वरील सर्व तंत्रज्ञ हे, स्वतंत्र प्रज्ञेचे, सृजनशील कलाकार आहेत, याचे भान दिग्दर्शकाला हवे. या सर्वांवर लेखकाने संहितेतून आणि दिग्दर्शकाने अनावश्यक सूचनेतून, कल्पना लादू नयेत. तेव्हाच नाटक एक कोलॅबरेटिव्ह वर्क होईल, हे या चर्चेचे साधारण सार समोर आले.

संदेश बेंद्रे (नेपथ्य), नीरजा पटवर्धन (वेशभूषा), मिलिंद जोशी (पार्श्वसंगीत), अमोघ फडके (प्रकाशयोजना) आणि उलेश खंदारे (रंगभूषा) हे सर्वच प्रशिक्षित, अनुभवी आणि सिद्धहस्त कलाकार असल्याने, त्यांच्या अनुभवातून, अनेक बारीक, नेमक्या गोष्टी, अडचणी, त्यावर काढलेले मार्ग, त्यांची सृजन प्रक्रिया, याची समज प्रेक्षकांना आली.

अशा प्रकारच्या चर्चेत, लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांची उपस्थिती महत्त्वाची. नाट्य निरंतरच्या उपक्रमांना, सहसा तशी उपस्थिती असतेच. सर्वश्री दिलीप जाधव, अजित भुरे, श्रीपाद पद्माकर, विजय केंकरे, राजन ताम्हाणे, चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश सातपुते हे निर्माते, दिग्दर्शक उपस्थित होते. प्रशांत दळवी, विवेक आपटे, डॉ. विजयकुमार देशमुख असे लेखक रोहिणीताई हट्टंगडी, निखिल हजारे , अपर्णा चोथे हे कलाकार, अशी उपस्थिती होती. लेखक, तंत्रज्ञ आणि कलाकार, यांची जास्त उपस्थिती अपेक्षित होती कारण, नाटकाच्या सर्व तांत्रिक अंगांचे, एकच वेळी, दोन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या, उत्कृष्ट तंत्रज्ञाकडून, कल्पना, रचना ते निर्मितीमागील विचार समजून घेणे, प्रत्येक रंगकर्मीसाठी अत्यावश्यक. पण
असा योग सहजी मिळत नाही.

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here