*संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा भाजपा डाव हाणून पाडा, एकाही नागरिकाचे नाव वगळले जाऊ नये.*
मुंबई, दि. १४ जूलै..
निवडणूक आयोगाने मतदार यांद्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया (SIR) सुरु केलेली आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा मात्र या प्रक्रियेच्या माध्यमातून नावे वगळ्याचा कुटील डाव दिसत आहे. बिहार, पश्चिम बंगालमध्ये अशाच पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ करून व्होट चोरी करण्यात आली. आता मुंबईतही भाजापाचे नेते मतदार यादीतून काही नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोगावर दबाव आणत आहेत. अशा प्रवृत्तींचा कुटील डाव लक्षात घ्यावा व पारदर्शक पद्धतीने एसआयआर प्रक्रिया राबवावी, असे मुंबई काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
सुरेशचंद्र राजहंस पुढे म्हणाले की, भाजपाचे एक माजी खासदार जाणीवपूर्वक मतदार याद्यांतून काही लोकांची नावे वगळण्याची मागणी करत आहेत. एखाद्या प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी ज्या इमारती पाडण्यात आल्या आहेत अथवा एसआरएचे प्रकल्प सुरु आहेत, त्या लोकांचे मॅपिंग करण्यात आलेले आहे पण ती नावे वगळावित अशी मागणी हे भाजपाचे महाशय करत आहेत. परंतु निवडणूक आयोगाने अशा पद्धतीच्या कोणत्याही दबावाला न जुमानता कोणाचेही नाव वगळले जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. पुनर्विकासासाठी तात्पुरते स्थलांतर करावे लागलेल्या लोकांची नावे जर वगळली तर तोच चुकीचा पायंडा पडेल व मुंबईत अनेक भागातून अशीच नावे वगळली जातील हे धोकादायक आहे.
एसआयआर प्रक्रियेसंदर्भात काँग्रेस पक्षाने वारंवार निवडणूक आयोगाला पत्र पाठवून व प्रत्यक्ष भेट घेऊन सुचना व आवाहन केलेले आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र व स्वायत्त संस्था आहे, त्यांनी सत्ताधारी भाजपाच्या बेकायदेशीर मागण्यांना थारा देऊ नये. संविधानाने १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आह तो अधिकारच काढून घेण्याचा मनुवादी भाजपाचा डाव आहे, तो हाणून पाडला पाहिजे, त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही एसआयआर प्रक्रियेवर बारीक नजर ठेवली पाहिजे, असेही सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.



















