*दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून कठोर कारवाई – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे*
मुंबई, दि. ९ जुलै २०२६ : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत प्राप्त झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांच्या तक्रारींची एक महिन्याच्या आत सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी माण तालुक्यातील रानण–गोंदवले खुर्द तसेच वळई–बनगरवाडी या रस्त्यांच्या कामांबाबत निकृष्ट दर्जाच्या कामांच्या तक्रारींचा मुद्दा उपस्थित केला.
यावर उत्तर देताना मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले की, रानण–गोंदवले खुर्द रस्त्याचे सुमारे ₹५.७७ कोटी, तर वळई–बनगरवाडी रस्त्याचे सुमारे ₹१२ कोटी खर्चाचे काम असून, या दोन्ही कामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विभागाबाहेरील अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात येणार असून, तिचे नेतृत्व मुख्यमंत्री सडक योजनेचे सचिव करतील. संबंधित कामांबरोबरच महेंद्र कन्स्ट्रक्शन आणि देसाई कन्स्ट्रक्शन यांनी सातारा जिल्ह्यात केलेल्या इतर कामांचीही तपासणी केली जाईल.
मंत्री श्री. गोरे यांनी स्पष्ट केले की, एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल प्राप्त करून त्यानुसार दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल तसेच नियमानुसार आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल.
000 00


















