संजय राठोड यांच्या पुढाकाराने २१ ऑगस्ट आता ‘जलसंधारण दिन’; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या जलसंधारण चळवळीचे जनक, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या दूरदृष्टीपूर्ण विचाराने राज्याला जलसाक्षरतेची नवी दिशा देणारे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्य शासनाने ऐतिहासिक स्वरूपाचा सन्मान दिला आहे. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत, स्व. सुधाकरराव नाईक यांचा २१ ऑगस्ट हा जन्मदिन आता दरवर्षी ‘जलसंधारण दिन’ म्हणून राज्यभर शासकीय स्तरावर साजरा करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
हा निर्णय केवळ एका स्मृतिदिनाचा बदल नसून, महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाच्या इतिहासात मोलाची भर घालणाऱ्या नेतृत्वाला दिलेला सन्मान आहे असे मत मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.
१९९१ ते १९९३ या काळात मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना सुधाकरराव नाईक यांनी राज्यातील भीषण दुष्काळाचा जवळून सामना केला. मोठ्या धरणांवर अवलंबून राहण्याऐवजी जलसंधारण, पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभाग यावर आधारित विकास मॉडेल त्यांनी राज्यासमोर ठेवले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा त्यांचा मंत्र आजही जलसंधारण क्षेत्रातील सर्वात प्रभावी संकल्पना मानली जाते. त्यांनी राज्यात स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची स्थापना केली, माती नाला बांध, सलग समतल चर, नाला बंडिंग यांसारख्या लघु जलसंधारण कामांना चालना दिली आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप दिले.
स्व. सुधाकरराव नाईक यांच्या या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा गौरव कायमस्वरूपी राज्याच्या स्मरणात राहावा, नव्या पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी आणि जलसंधारणाबाबत जनजागृती अधिक व्यापक व्हावी, यासाठी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यांच्या पुढाकारातूनच हा प्रस्ताव शासनाने मंजूर करत २१ ऑगस्ट हा दिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून घोषित केला आहे.
शासन निर्णयानुसार, आता दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी राज्यभर मृद व जलसंधारण विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन, ‘मृद व जलसंधारणाची शपथ’, विविध जलसंधारण प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण, जलपूजन, लोकसहभागातून श्रमदान, जनजागृती अभियान तसेच उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान असे विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र निधी न देता विभागाच्या उपलब्ध प्रशासकीय तरतुदीतून कार्यक्रम राबविण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
मंत्री संजय राठोड यांनी जलसंधारण विभागाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जलसंवर्धनाला नवे बळ देण्यावर भर दिला आहे. राज्यभर जलसंधारणाची कामे गतीमान करण्याबरोबरच या क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान होणे आवश्यक असल्याची त्यांची भूमिका होती. त्याच भूमिकेचा परिपाक म्हणून आजचा हा ऐतिहासिक निर्णय समोर आला आहे.
या निर्णयामुळे स्व. सुधाकरराव नाईक यांचा जलसंधारणाचा विचार अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचणार असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही चळवळ नव्या पिढीसाठी प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे. जलसंधारण क्षेत्रातील एका युगपुरुषाला दिलेला हा राज्याचा मानाचा मुजरा दिल्या बद्दल मंत्री संजय राठोड यांचे जनतेकडून आभार व्यक्त केले जात आहेत.


















