Home मुंबई *महागाई आखाती युद्धामुळे नव्हे, तर* *सरकारच्या नाकर्तेपणामुळेच;*

*महागाई आखाती युद्धामुळे नव्हे, तर* *सरकारच्या नाकर्तेपणामुळेच;*

28
0

*आमदार अंबादास दानवे यांचा विधान परिषदेत घणाघात!*
मुंबई – “राज्यातील वाढती महागाई ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे किंवा आखाती युद्धामुळे वाढलेली नाही, तर ती केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या चुकीच्या व चक्रावून टाकणाऱ्या धोरणांमुळेच वाढली आहे,” असा थेट आणि विखारी हल्ला माजी विरोधी नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत चढवला. विरोधकांच्या वतीने मांडण्यात आलेल्या २६० च्या प्रस्तावावर बोलताना माजी विरोधी पक्षनेते दानवे यांनी महागाई, रखडलेली नोकरभरती आणि शेतकऱ्यांची होणारी लूट यावरून राज्य सरकारला अक्षरशः धारेवर धरले.

सरकारकडून प्रत्येक वेळी महागाईचे खापर आखाती युद्धावर फोडले जाते, यावर कडाडून टीका करताना दानवे म्हणाले, “महागाईची समस्या युद्धाच्या आधीपासूनच गंभीर आहे. सरकारने स्वतःच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून राज्यात महागाई असल्याचे अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे. पेट्रोल, वीज आणि उत्पादन शुल्कावरील वाढीव करांमुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. जून २०२६ मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७४ डॉलर इतकी खाली आलेली असतानाही, राज्यातील जनतेला महागडे इंधन का विकले जात आहे?” असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला.

शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दराच्या दरीवर बोट ठेवत त्यांनी सरकारचे वाभाडे काढले. “शेतकऱ्यांच्या दुधाला अवघा ३० रुपये प्रतिलिटर दर मिळत असताना, मुंबई-पुण्यातील ग्राहकांना तेच दूध ७० रुपयांनी विकत घ्यावे लागत आहे. कांदा, तूर, हरभरा आणि गहू या पिकांचीही तीच अवस्था आहे. २०१४ च्या तुलनेत रासायनिक खतांच्या (युरिया, डीएपी, पोटॅश) किमती गगनाला भिडल्या आहेत. मग हा मधील पैसा जातोय कोणाच्या खिशात?” असा रोखठोक प्रश्न त्यांनी विचारला.

तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नोकरभरतीच्या मुद्द्यावर अंबादास दानवे आक्रमक झाले. “राज्यात सात लाख पदांपैकी तब्बल दोन लाख पदे रिक्त पडून आहेत. ७० हजार नोकरभरतीचे केवळ गाजर दाखवले गेले, पण त्याचा ठोस आराखडा कुठे आहे? ५ मे २०२६ रोजी राज्य सरकारने ‘लघुलेखक’ पद मृत घोषित करून ५ ते १० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले आहे. हा तुघलकी निर्णय सरकारने तात्काळ मागे घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
तलाठी, म्हाडा आणि आरोग्य भरती प्रक्रियेतील घोटाळे व विलंबाचा पाढा वाचत, दानवे यांनी ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपटातील गाण्याच्या ओळी सादर करत सरकारच्या शेतकरी आणि तरुण विरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here