Home मुंबई *विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी भाजपाकडून विरोधी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स:...

*विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी भाजपाकडून विरोधी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स: हर्षवर्धन सपकाळ*

9
0

*सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाने लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली; भाजपाला इलेक्शन नाही तर नॉमिनेशन सिस्टिम आणायची आहे.*

मुंबई/बुलढाणा, दि. ४ जून २०२६.

भारतीय जनता पक्षाची सर्वत्र सत्ता असतानाही आणखी सत्ता हवी या सत्तेच्या हव्यासापोटी ते लोकशाही मुल्ये पायदळी तुडवत आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजपाने नैतिकता गुंडाळून सर्व हातखंडे वापरले आहेत. भाजपाला लोकशाही नको आहे, ‘इलेक्शन सिस्टिम’ नाही तर ‘नॉमिनेशन सिस्टिम’ भाजपाला हवी आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या सध्या सुरु असलेल्या निवडणुकीचा मतदार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून गेलेले प्रतिनिधी असतात, हा मर्यादीत मतदार असतो. पण या निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’, चा खेळ खुलआमपणे सुरु आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यावेत यासाठी सत्ताधारी भाजपा महायुतीने सत्ता पैसा या सर्व तंत्राचा गैरवापर केला आहे. घातपात, विश्वासघात, पैशाचे प्रचंड वाटप करण्यात आले आहे. या निवडणुकीला सत्ताधारी महायुती अत्यंत विकृत पद्धतीने सामोरे जात आहे, हे चित्र लोकशाहीसाठी अजिबात चांगले नाही.

निवडणुका या लोकशाहीचा उत्सव असतात, त्या निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्या पाहिजेत पण भाजपाची सत्तेची राक्षसी हाव वाढली आहे आणि यातूनच मदमस्तपणाही वाढलेला दिसत आहे, त्याचेच पडसाद विधान परिषद निवडणुकीतही उमटले आहेत. भाजपाने निवडणुकीत घोडेबाजार केला असून हे लोकशाहीसाठी काळे पर्व आहे, त्यातून बाहेर येण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. भाजपा व निवडणूक आयोगाची अभद्र युती आहे. मविआची सदस्य संख्या कमी असली तरी त्याचा काय संबंध? असा प्रश्न उपस्थित करून १९८४ साली भाजपाचे लोकसभेत दोनच खासदार निवडून आले होते, त्यावेळी कोणी सदस्य संख्येबद्दल बोलले नव्हते. भाजपाची सदस्य संख्येवरची भाषा ही लोकशाही गुंडाळून ठेवायची मानसिकता दाखवते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here