Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *फुगलेली शिबिरे आणि शिबिरांचे फुगे*

*फुगलेली शिबिरे आणि शिबिरांचे फुगे*

160
0

उन्हाळ्याची सुट्टी म्हणलं की वेगळ्या प्रकारच्या शिबिरांची निवेदने, जाहिराती आणि वेगवेगळ्या ठिकाणी इन्स्टा, एफबी, वरती आपल्याला भरपूर पोस्ट, जाहिराती, बघायला मिळतात
शिबिर घेणारे कोण यांची काही वेळा नावेही नसतात.त्यांची असलेली रंगभूमी कलेबाबतची आत्मीयता याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत.
गेल्या पाच वर्षांमध्ये तर पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे जिकडेतिकडे शिबिरांची संख्या वाढत चाललेली आहे, विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर सोलापूर कोल्हापूर अशा ठिकाणी असलेली शिबिरांची संख्या विशेष करून नजरेत भरते,
ही रंगभूमी कलेच्या संदर्भातली असलेली आत्मीयता म्हणायची का रंगभूमी कलेला लक्ष करून आपली स्वतःची पाकिट खिसे भरायचे ,असा एक शंकेचा सूर मनात निर्माण होत आहे .
पूर्वी काही ठराविक संस्था आणि त्यामधली असलेली प्रसिद्ध दिग्गज मातब्बर मंडळी यांची शिबिरे म्हणजे एक आनंद अनुभवच होता. उदाहरणार्थ कमलाकर सोनटक्के ,विजया मेहता दामू केंकरे,जयदेव हतंगडी अशी कितीतरी नावं देता येतील .
ज्यांच्या प्रशिक्षणातून हजारो कलाकार घडले आणि त्यांनी ते जाणीवपूर्वक घडवले,
शिबिराचा केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास त्यात होता, त्यातून लेखन ते प्रयोग निर्मितीचा एक ठसा शिकणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या मनावरती उमटला जायचा.
शिबिर घेणारे हे स्वतः अनेक वर्ष रंगभूमीची कला साधना म्हणून काम करत होते ,रंगभूमी कला याबाबत स्वतः कलाकार म्हणून प्रयोग करते म्हणून जागरूक होते,
त्यांच्या शिकवण्यामागे असलेली आत्मीयता आणि रंगभूमीची जाण शिकणाऱ्यांना रंगभूमीकडे बघण्याचा दृष्टिकोन देत असे.
विषय कुठलाही असो लेखन, दिग्दर्शन, अभिनय ,नेपथ्य, प्रकाश, रंगभूषा ,संगीत या त्या त्या विषयातील मातब्बर माणसं नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानातून समंजस करत असताना दिसत.
प्रत्येकाची प्रशिक्षण देण्याची पद्धत ,एक वेगळीच हातोटी . त्यामागे शिस्त, ज्ञान, आत्मीयता आणि महत्त्वाचे म्हणजे निरपेक्ष वृत्ती होती
आजकाल प्रत्येक मुलामागे मला किती पैसे मिळणार माझा खिसा किती भरणार यावरती अधिक भर दिला जातो.
आज अशी सर्व मातब्बर मंडळी या सगळ्या प्रशिक्षण प्रक्रिया आणि अनुभव यात कुठेच दिसत नाही.
केवळ आणि केवळ व्यावसायिकता धंदेवाईकपणा याचे सध्या पेव फुटले आहे,
पालकांना कुठल्या शिबिरात पाठवायचे हा मोठा संभ्रमही पडलेला आहे ,त्यातून तुम्हाला नाटकात सिनेमात ,मालिकेत वेब सिरीज मध्ये काम देऊ अशा प्रकारच्या बतावण्या सर्रास जाहिरातीमधून केल्या जातात .
खरंतर दहा दिवसाच्या कार्यशाळेमध्ये अशा प्रकारचचा लोभ निर्माण करणाऱ्या जाहिराती आणि पालकांची ही मागणी यातून कस गुणवत्ता कमी असणारे कलाकार निर्माण होत आहेत. पालकांना आणि मुलांना भुरळ घालणारे , शिबिर प्रमुख शिबिरानंतर त्याचा काय प्रकारचा पाठपुरावा करतात याबाबत गौडबंगालच आहे.
आवाच्या सवा घेत जात असलेली शिबिर फी, ही तर पालकांच्या अर्थकारणाला छेद देणारी आहे .
पूर्वी मुले घरात असली तर काही ना काही वेगवेगळ्या खेळामधून रमत असत, पत्ते कॅरम बुद्धिबळ किंवा संध्याकाळचे मैदानी खेळ वाचन
यात रमत. आता त्यांची जागा मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि तत्सम संगणकीय तंत्राने घेतली आहे ज्यामुळे मुलांचे डोळे ब्लॉक आणि कान बहिरे, बोलणं बंद झाले आहे .
रंगभूमी कलेचे शिबिर म्हणजे साक्षात जिवंत अनुभवाचा झराच
या झऱ्यांचे मूळ जिवंत स्त्रोत सध्या मुलांच्या मानसिक,बौद्धिक आणि शारीरिक ब्लॉक होण्याने ब्लॉक झाले आहे
काही मातब्बर मंडळी तर निवासी शिबिर सुद्धा घेत असत .आता अशा प्रकारच्या शिबिरांमध्ये नाटकाचा तास एक दीड तास आणि बाकी घोडेसवारी ,आर्चरी रायफल ट्रेनिंग, जुडो कराटे, पेंटिंग अशा अनेक विविध कलांचा समावेश केल्यामुळे फक्त रंगभूमी कलेच्या संदर्भात होणारे मार्गदर्शन यावर मर्यादा आलेल्या आहेत .
शिबिरांची संख्या वाढली आहे ,ती फुगलेली पण आहे.
हे फुगे गॅस भरलेल्या सारखे उन्हाळ्याच्या सुट्टीत आकाशभर उडतात, लालूच दाखवतात पण त्यातून पुढे केवळ सुट्टी मध्ये असलेले त्याचे प्रयोजन आणि पालकांची असलेली मुलांबाबतची अति काळजी यावर विचार होणे गरजेचे आहे.
आज घरात वृद्ध माणसं कमी त्यामुळे लक्ष आणि नियंत्रण कमीच.पालक तत्व हे मटे रियलिस्टि झाले आहे ,मुलांना खाऊ द्या ,कपडे द्या , व्हिडिओ खेळ द्या फ्रीडम द्या यातून जबाबदारी चा कस कमी होत आहे,हे द्या. ते द्या आणि मुलांनी कोपऱ्यात जाऊन शांत बसा, आणि आम्हाला आमचं जगू द्या ,आम्हाला आमचे नोकरी धंदे करू द्या, अशा प्रकारची मानसिकता बळावली आहे.संस्कार नावाची जी मूल्यात्मक गरज आहे ती कशी पूर्ण होणार?
शिबिर घेणारे यांच्यावरच काही संस्कार असायला हवेत, त्यातलं सातत्य, शिस्त, नियम, वेळेचे पालन, नवनिर्मिती आणि निरपेक्षता याबद्दल संशय निर्माण झालेला आहे.
रेकॉर्ड साऊंड ट्रॅक वरती हालचाली करणे यामुळे रंगभूमी कलेचा संस्कार होत नाही तर असे काहीतरी वेगळे करणे म्हणजेच नाट्यकला अशी चुकीची समजूत होत आहे.
शिविर प्रमुख शिबिर घेणारे सहाय्यक यांचा काही ठिकाणी चाललेला सरधोपट पणा थांबायला हवा.
शिबिर घेणाऱ्या व्यक्तीकिती शिकलेल्या आहेत? तज्ञ आहेत की नाही याची विचारपूस पालकांनी सखोल करायला हवी. त्यांचा अनुभव काय? त्यांचे याबाबतीतले शिक्षण काय? यावर वरिष्ठांची आणि सरकारची नजर असायला हवी. थोडक्यात शिबिर घेणाऱ्या कडे तर अशा प्रकारचे लायसनच हवे .
पण हा सगळा विशेषतः कलेबाबतचा चाललेला खेळ खंडोबा कुठले चांगल्या प्रकारचे प्रयोग निर्माण करेल याबाबत शंका आहे, उपपटांग घेतलेले प्रशिक्षण त्याच्यातून निर्माण झालेले नाट्यप्रयोग यामध्ये मनोरंजनाची बकवास आहे .प्रबोधनाचा अभाव आहे आणि संस्काराची रुजवात याबाबत शंका आहे

एकीकडे शहरांमध्ये वेगवेगळ्या नाट्य आणि कला शिबिराची रेल चे ल आहे ,थोडक्यात अजीर्णही आहे
आणि एकीकडे गावात वस्त्यांवर ,पाड्यांवर जिथे मुलांपर्यंत रंगभूमी कला पोहोचणे गरजेचे आहे, इथे हे ग्लोबल प्रशिक्षक कलाकार मात्र जाण्यास तयार नाहीत. त्यांना शहरांमध्ये मोठ्या बॅनर खाली काम करण्यातच धन्यता वाटते.
रंगभूमी कलेचा संस्कार हा फक्त शहरवासीयांचा अधिकार नाही तर तो ग्रामीण आणि वाड्या, वस्त्यांवर खेड्यांमध्ये, सुद्धा रुजला पाहिजे तिथल्याही मुलांचा तो अधिकार आहे ,या जाणिवेने त्या प्रकारचे काम होणे गरजेचे आहे .
अशा प्रकारचे काम मी स्वतः देवदत्त पाठक गेल्या पंचवीस वर्षापासून फक्त आणि फक्त गावातल्या मुलांसाठी वंचितांसाठी सुट्ट्यांमध्ये करत आहे ,माझ्याबरोबर माझे सहकारी विद्यार्थी मिलिंद केळकर, नेहा कुलकर्णी, धनश्री गवस अर्णव देशपांडे, गौरी बनसोडे, उषा देशपांडे ऋतुजा केळकर ,इत्यादी विद्यार्थी मित्र कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवून मदत करत आहेत.
रंगभूमी कला ही फक्त मनोरंजनासाठी नाही तर ती व्यक्तिमत्व विकास आणि क्षमता विकासासाठी ही असायला हवी या हेतूने रंगमंच खेळ ,रंगभूमी पाठ प्रात्यक्षिक, सराव, सादरीकरण, चर्चा चिकित्सा याचा उपयोग करून ही अशा प्रकारची शिबिर व्हायला हवी .
गेल्या बारा वर्षापासून तर ही अशा प्रकारची शिबिरे मी व माझे सहकारी मोफत घेत आहोत
खरोखरच तहानलेल्या पाणी मिळावे तसेही गावातली खेड्यातली मुलं शिबिरासाठी प्रचंड गर्दी करतात आणि आमच्या इथे असं काही नाही, असं म्हणून नाराज होतात, आता तुम्ही परत कधी येणार?? आणि आम्हाला कधी दिसणार आमच्या इथे असं कोणीच काही घेत नाही ?अशा प्रकारच्या नाराजीचा सूर व्यक्त करून आपापल्या घरी पोहोचतात, पण रंगभूमी कलेची असलेली आवड आणि त्यातून निर्माण झालेली ओढ, यातून मात्र एखादा चांगला कलाकार आणि अनेक सुजाण प्रेक्षक घडेल किंवा घडतो असं म्हणायला हरकत नाही. हे अशा प्रकारच्या शिबिरातून व्हायला हवे.
त्याचा अभ्यासक्रम असावा .
त्याचा योग्य तपशील असावा ,योग्य विषयांच्या साठी योग्य पद्धतीचे तज्ञ प्रशिक्षक असावेत ,आणि फक्त शहरांमध्येच काम न होता, गावागावात अशा प्रकारच्या कार्यशाळा घडाव्यात ,आणि मुलांची संख्या यावरती सुद्धा बंधन असावे, त्याबद्दल विशिष्ट अभ्यासक्रम असावा, तरच हे सध्याचे शिबिरांचे फुगलेले आकडे आणि हवेत विरून जाणाऱ्या मुलांच्या आशा यावरती नियंत्रण येईल .
गावातल्या तज्ञ रंगकर्मींनी
याबाबत माहिती मिळवून आवाज उठवला पाहिजे, व त्यातून शिबिर घेणाऱ्यांचे ही शिबिर यावे, योग्य पद्धतीने शिकून मग त्यांनी फक्त पुणे मुंबई न गाठता ,गावात आजूबाजूला वाड्यावर, जावे, यामुळे शिबिराची गुणवत्ता वाढेल, आणि अशा प्रकारची सातत्याने होत जाणारी शिबिरे, ही मुलांना रंगभूमी कलेबाबत योग्य दृष्टिकोन देतील असा विश्वास वाटतो. अभ्यास पूर्ण शिबिरे ही उद्याच्या रंगभूमी कलेची सक्षमता आणि समृद्धता वाढवतील असे विश्वासपूर्वक नमूद करावेसे वाटते .

देवदत्त पाठक
ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ, आणि प्रशिक्षक
9822024563.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here