राज्यात जागतिक वारसा पर्यटन क्षेत्रांची संख्या, तसेच मागील काही वर्षांपासून अंतर्गत पर्यटकांची वाढली असल्याने आदरतिथ्य हा पर्यटन क्षेत्रातील मुख्य व्यवसाय झाला आहे.
२०१४-१५ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात एकूण २८ कोटी देशांतर्गत आणि ३ कोटी विदेशी पर्यटकांनी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेटी दिल्या असल्याचे समोर आले होते. यामुळे आदरातिथ्य क्षेत्र हे पर्यटन व्यवसायाचे सर्वात महत्वाचे अंग झाले असून त्याला औद्योगिक दर्जा देण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली.
देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांकडून या भेटी दरम्यान मोठ्या प्रमाणत हॉटेल्स अँड रेस्टॉरंट चा उपयोग केला जातो. पर्यायाने छ. संभाजी नगर, शिर्डी, नाशिक, पुणे इत्यादी शहरे पर्यटक शहरे म्हणून उदयास येत असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची पण निर्मिती होत आहे. तसेच विदेशी पर्यटक हे राज्याला परकीय चलन मिळवून देण्याचा एक परिणामकारक साधन बनले असल्याचे दानवे यांनी पत्राद्वारे लक्षात आणून दिले आहे.
आदरातिथ्य क्षेत्र हे पर्यटन व्यवसायाचे सर्वात महत्वाचे अंग आहे.त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून १ एप्रिल २०२१ पासून विन दर, विज शुल्क, पाणी पट्टी, मालमत्ता कर, विकास कर, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक व अकृषी कराची आकारणी औद्योगिक दराने करणे बाबत तसेच आदरातिथ्य क्षेत्रास औद्योगिक दर्जा देण्याबायत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
शासन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,नगरविकास विभाग,महसूल व वन विभाग आणि इतर संबंधित विभागांनी पुढील कार्यवाही करणे अपेक्षित होते, मात्र या विभागांकडून पुढील कार्यवाही न झाल्यामुळे अद्यापही नोंदणीकृत हॉटेल व्यावसायिकांकडून व्यवसायिक दराने विज आणि इतर सुविधांची आकारणी आणि वसुली केली जात असल्याची गंभीर स्थिती दानवे यांनी दाखवून दिली आहे.
सदरील प्रकरणी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांची बैठक आयोजित करून आदरातिथ्य क्षेत्रास औद्योगिक दर्जा देण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा. तसेच सदर बैठकीत मलाही आमंत्रित करावे अशी मागणी अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली आहे.





















