Home मुंबई *महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व-गणना...

*महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व-गणना करत केला जनगणना-२०२७ मोहिमेचा शुभारंभ*

6
0

*• मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्यासह अन्य मान्यवरांकडूनही स्व-गणना प्रक्रिया*

*• राष्ट्रीय जनगणनेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन*

महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुखमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पद्धतीने स्व-गणना करत भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ मोहिमेचा शुक्रवार (दि. १ मे २०२६) मुंबई येथून शुभारंभ केला. तसेच, या राष्ट्रीय जनगणनेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन देखील माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी यावेळी केले.

भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ अंतर्गत दि. १ मे २०२६ पासून प्रथम टप्पा अर्थात स्व-गणनेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथील लोकभवन या शासकीय निवासस्थानी स्व-गणना करून जनगणना-२०२७ मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी माननीय राज्यपाल यांच्या पत्नी सुधा देव वर्मा उपस्थित होत्या.

महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी स्व-गणना करून जनगणना-२०२७ मध्ये नोंद केली. यावेळी, माननीय मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस यांची उपस्थिती होती.

तर, मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्र शेखर, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्यासह अन्य मान्यवरांनीही स्व-गणना करुन जनगणना मोहीमेत सहभाग नोंदवला.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा अतिरिक्त प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, महाराष्ट्राच्या प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) एम. देवेंदर सिंह, माननीय राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसंचालक (जनगणना) संतोष पायस, जनगणना उप महानिबंधक ए. एन. राजीव, बृहन्मुंबई महानगरपालिका जनगणना अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात जनगणना-२०२७ केली जात आहे.

याबाबत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा अतिरिक्त प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले की, जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात दि.१ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वतः डिजिटल पद्धतीने स्व-गणना करायची आहे. यासाठी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून स्व-गणना करावी लागेल. तसेच, यामध्ये दिलेल्या ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. अवघ्या दहा मिनिटात स्व-गणना करता येणे शक्य आहे. याच अंतर्गत दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जनगणना प्रगणक घरोघरी जाऊन माहितीचे सत्यापन आणि पडताळणी करतील. जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होईल. ज्यामध्ये प्रत्यक्ष घरोघरी जाऊन गणना करण्यात येईल.

बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुमारे २५ हजार कर्मचारी जनगणनेसाठी प्रगणक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईकर नागरिकांनी या जनगणनेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. तसेच, जनगणनेसाठी गृहभेटी देणाऱ्या प्रगणकांना योग्य माहिती द्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. विपिन शर्मा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here