कौशल्य विद्यापीठ हे रोजगाराभिमुख आणि उद्योगाभिमुख शिक्षण देणारे अग्रगण्य संस्थान - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
महामहिम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लाभणार मार्गदर्शन
मुंबई दि. २०
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता लोकभवन येथील ऐतिहासिक दरबार हॉल मध्ये होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास भारताचे उपराष्ट्रपती मा. श्री.सी.पी. राधाकृष्णन जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या या विद्यापीठाचा हा पहिलाच दीक्षांत समारंभ विशेष महत्त्वाचा मानला जात असून राज्याचे महामहिम राज्यपाल जिष्णु देव वर्माजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले की, “भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी देशातल्या तरुणांचे सामर्थ्य ओळखले असून त्यांनी देशभरात कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देश महासत्तेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण या वाटचालीत महत्वाचे योगदान देणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीसजी यांच्या रूपात राज्याला दूरदृष्टीचे मुख्यमंत्री लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील कौशल्य विभाग तरुणांसाठी विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवत आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे उद्योगाभिमुख शिक्षण देणारे अग्रगण्य संस्थान म्हणून ओळखले जाते. या विद्यापीठातील विविध अत्याधुनिक विषयांवरील अभ्यासक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळणार मिळत आहे. या विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा म्हणजे राज्यातील कौशल्य विकास क्षेत्रातील एक नवा टप्पा असल्याचे नमूद करू इच्छितो असेही, मंत्री लोढा यांनी सांगितले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची जुलै २०२२ मध्ये स्थापना झाली आहे. उच्च दर्जाचे कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम तरुण घडवण्यासाठी, रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी हे विद्यापीठ कार्यरत आहे. स्टार्टअप्स, इनक्युबेशन, रोजगारक्षमता, प्रशिक्षण, समुपदेशन या विशेष बाबींवर विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. लवकरच पनवेल येथे विद्यापीठाची भव्य इमारत उभी राहत असून विद्यापीठाची नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपुर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात आणि खाजगी आस्थापनेत केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्रात खालील अभ्यासक्रम शिकविले जातात.
• स्कूल ऑफ सायन्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कौशल्य
• व्यवस्थापन आणि वाणिज्य कौशल्य शाळा
• डिझाईन आणि सर्जनशील कौशल्ये विद्यालय
• अल्प कालावधीचे कौशल्य प्रमाणपत्रे
• आंतरराष्ट्रीय नोकऱ्या आणि त्यासंदर्भातील कौशल्य
या सगळ्या अभ्यासक्रमांना उद्योगांची जोड देण्यात आली आहे. यात विद्यापीठाची पार्टनरशिप ही पर्सिस्टन्ट सिस्टिम, किर्लोस्कर ग्रुप, मायक्रोसॉफ्ट इत्यादी कंपन्यांशी केलेली आहे. अत्याधुनिक कौशल्याधारित ‘बॅचलर ऑफ डीझाईन’ हा अभ्यासक्रम ’रुबिक फ्रांस’ या युरोपातील प्रख्यात संस्थेसोबत करार करुन चालविण्यात आला आहे. याचप्रमाणे विद्यापीठात आरोग्य सेवेतील वैद्यकीय सहाय्यक कौशल्य अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर विद्यापीठात उद्योगस्नेही अशा विविध विषयांतर्गत पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे. यासाठी प्रयोग शाळाही उभारण्यात आल्या आहेत. तसेच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ द्वारा “कोड विदाउट बॅरियर” उपक्रमांतर्गत “मायक्रोसॉफ्ट इंडिया ” च्या सहकार्याने राज्यातील १०००० महिला शिक्षक आणि विद्यार्थिनीना “एआय कौशल्य” प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील महिलांना जनरेटिव्ह एआय कौशल्ये प्रदान करून, उच्च शिक्षणातील शिक्षक, उच्च शिक्षणातील महिला विद्यार्थी आणि महिला उद्योजकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना सक्षम करण्यासाठी हा कार्यक्रम उपक्रमात संरेखित केलेला होता. या दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासोबतच मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट औद्योगिक संस्थांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा हा केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान नसून, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या कौशल्यांच्या बळावर आपल्या युवकांना देश-विदेशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,” असे ही कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.



















