Home मुंबई *लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुक लढवता आली नाही तरी लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करावे.*

*लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुक लढवता आली नाही तरी लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करावे.*

28
0

*‘विकसित भारत युवा संसद’ राज्यस्तरीय परिषदेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा तरुणांना मार्गदर्शनपर संदेश*

मुंबई
विकसित भारताच्या युवा पिढीला प्रेरणा देण्यासाठी २०१९ पासून सुरू झालेल्या ‘विकसित भारत युवा संसद’ या व्यासपीठाच्या राज्यस्तरीय परिषदेत विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तरुणांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात, आणीबाणीच्या ५० वर्षांच्या निमित्ताने भारतीय लोकशाहीसाठी मिळालेल्या धड्यांवर चर्चा असा विषय होता. कार्यक्रमाचे संयोजन माय भारतचे संचालक अमित पुंडे यांनी केले होते.

डॉ. गोऱ्हे यांना प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन संवाद साधताना सांगितले की, “तरुणांना संवाद साधण्याची, आपले स्वप्न, दिशा आणि उद्दिष्ट मांडण्याची संधी मिळावी, यासाठी हे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. हे अतिशय चांगले व्यासपीठ आहे, जिथे तरुणांना बोलण्याची संधी मिळते आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी ऐतिहासिक संदर्भ देत लोकनेते जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांनी युवकांसाठी छेडलेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. त्यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षतोडबंदी, भ्रष्टाचारबंदी, हुंडाबंदी अशा सात शपथा देण्यात आल्या होत्या. “आज आणीबाणीच्या ५० वर्षांनिमित्त जिल्हा स्तरावरून सुरू झालेली चर्चा आता राज्यस्तरावर पोहोचली आहे. यातून भारतीय लोकशाहीला काय धडे मिळाले, यावर बोलणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.

तरुण पिढीला पुढे जाण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, ‘भारत फर्स्ट’ देशाला प्रथम स्थान द्या, त्यानंतर मातृभूमी, गाव, जिल्हा, राज्य आणि कुटुंब. दुसरे ‘सातत्याने अभ्यास’ चांगले बोलण्यासाठी वेळेची मर्यादा, थांबण्याची जाणीव आणि संवाद कौशल्य आवश्यक आणि तिसरे म्हणजे, ‘समोरच्या माणसाशी संवाद’ थोड्या वेळात निर्णयापर्यंत पोहोचणे अशी त्रिसूत्री डॉ. गोऱ्हे यांनी सांगितली.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या वैयक्तिक प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की, त्या पोदार मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दहा वर्षे प्रॅक्टिस केली. नंतर सामाजिक चळवळी आणि शिवसेनेत २५ वर्षांपासून काम करत असल्याचे सांगितले. “तुम्हीही पुढे लोकप्रतिनिधी व्हा. निवडून आलात तर उत्तम, अन्यथा लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करा. यात महिला आणि पुरुष दोघांवरही सारखी जबाबदारी आहे,” असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘विकसित भारत युवा संसद’ ही स्पर्धा आणि व्यासपीठ देशभरातील युवकांना एकत्र आणून त्यांच्या कल्पना, चर्चा आणि नेतृत्व विकासासाठी महत्त्वपुर्ण ठरत आहे. राज्यस्तरीय परिषदेत विविध विषयांवर तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला.
——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here