*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे*
नवी दिल्ली
“आमचं कुटुंब खूप अडचणीच्या काळातून जात आहोत.एकमेकांना आधार देत आम्ही पुढे जात आहोत.आज दादा नाही, त्यामुळे मला जुनं उणंधुणं काढायचं नाही. तो माझा दादा होता. पण तो आज आपल्यात नाही. माझ्यात आणि दादात जी काही चर्चा झाली ती आमच्यात आहे. दादांची अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे.”असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खा. सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, “मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय. त्यांनी शब्द दिला आहे की याची सविस्तर चौकशी करतील. रोहितची अस्वस्थता साहजिक आहे. अनेक प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं सापडत नाहीयत. काय झालं, कसं झालं, आपण वाचवू शकलो असतो का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याने ही त्याची अस्वस्थता मांडली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सविस्तर चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्या चौकशीची आपण वाट पाहूयात.” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब रुग्णालयात असताना , पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी, राजनाथ सिंग, ओमर अब्दुलांसह अनेकांनी आदरणीय शरद पवार साहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्याकरता फोन केले होते. या सर्व काळात सर्वांनी पवार कुटुंबाला साथ दिली, त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानते.” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
रेवती व सारंग यांचं लग्न ठरल्याची घोषणा तुम्ही केली, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याची चर्चा सुरू आहे. त्याबद्दल काय सांगाल असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”खरंतर अनेक महिने ही चर्चा चालू होती. रेवती आणि सारंग गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखतात. आणि माझं भाग्य आहे की मला सहा भाऊ आहेत, माझे सगळेच भाऊ, त्या सर्वांनी या नात्याला आशिर्वाद दिला. त्यामुळे मी हे माझं भाग्य समजते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं. खरंतर हे दुर्दैवं आहे की दादा आपल्यातून २८ जानेवारी तारखेलाचा गेला, नाहीतर ही लग्न ठरल्याची घोषणा, सगळी फॅमिलीच ३० तारखेला करणार होती,एकच गोष्टीचं मला मनापासून समाधान वाटतंय की, दादाच्या आशिर्वादानेच हे लग्न ठरलं असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”शेतकऱ्यांचं चांगलं झालं तर आपल्या सगळ्यांना आनंदच वाटेल.पण, ट्रेड डीलमधून भारताच्या पदरात काय पडणार? यावर सरकारकडून स्पष्टीकरण आलेले नाही. केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांनी जे काही सत्य आहे ते पारदर्शकपणे लोकांना सांगावं,केंद्र सरकारने AI वर भर दिल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या, असे सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या.
यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,दादा असतानाच ५०० कोटी रुपयांचं मोठं प्रकल्प कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतीवर आणि आधारित उद्योग धंद्यांसाठी दिलं होतं. पुण्यात ‘कृषक’ यशस्वीपणे झालेलं आहे. दादाचं ते स्वप्न होतं, त्याचा पाठपुरावा योग्यरित्या व्हायला हवा. दादांची अपूर्ण स्वप्न पुर्ण करण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे.”असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना स्पष्टपणे म्हटले आहे.






















