*वांद्रे रेक्लेमेशन येथे हेलिपॅड उभारण्याची मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
मुंबई,
पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत तब्बल ३६ तासांहून अधिक काळ प्रवासी अडकले होते. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन वांद्रे–वरळी सी लिंक, वर्सोवा–वांद्रे वरळी सी लिंक तसेच संपूर्ण कोस्टल रोडवरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात, अशा महत्त्वाच्या मार्गांवर अपघात, आग किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास तातडीने व प्रभावी प्रतिसाद देणे मोठे आव्हान ठरू शकते, असे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः कोस्टल रोड हा भुयारी व समुद्रावरून जाणारा मार्ग असल्याने जखमींना त्वरित रुग्णालयात हलवणे, सुरक्षा यंत्रणांची जलद हालचाल आणि आपत्कालीन सेवा पोहोचवणे कठीण होऊ शकते.
या पार्श्वभुमीवर वांद्रे रेक्लेमेशन परिसरात, सी लिंकजवळ हेलिपॅड उभारण्याची तातडीची गरज असल्याची मागणी मंत्री ॲड.शेलार यांनी केली आहे. या हेलिपॅडसाठी आवश्यक जागा उपलब्ध असून यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
हेलिपॅड उभारल्यास कोस्टल रोड व सी लिंकवरील आपत्कालीन परिस्थितीत जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने हलवता येईल. तसेच लीलावती रुग्णालयासह परिसरातील अन्य प्रमुख रुग्णालयांपर्यंत जलद सेवा देता येणार आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ व इतर यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी होईल आणि मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत होईल, असेही पालकमंत्री ॲड.शेलार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
000





















