Home मुंबई *बदलापूरच्या लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीसह शाळा व्यवस्थापनावरही कठोर कारवाई करा;...

*बदलापूरच्या लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीसह शाळा व्यवस्थापनावरही कठोर कारवाई करा; दीड वर्षापूर्वीच्या घटनेतून सरकारने काय धडा घेतला ? खासदार वर्षा गायकवाड.*

52
0

*भाजपा महायुती सरकारमध्ये लहान मुलीही सुरक्षित नाहीत, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री झोपा काढतात काय?*

मुंबई,

“भाजपा महायुती सरकारमध्ये महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत हे बदलापुरातील घटनेने पुन्हा सिद्ध झाले आहे. दिड वर्षापूर्वी याच बदलापुरात शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेप्रकरणी लोकांनी संताप व्यक्त केला होता, पण सरकारने त्यातून काहीच धडा घेतलेला नाही, भाजपाशी संबंधित शाळेवर कारवाईही केली नाही. आता पुन्हा तसाच प्रकार घडला असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री झोपा काढतात काय?” असा संतप्त सवाल करुन शाळेसह सर्व संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी माजी शिक्षण मंत्री खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

बदलापूर प्रकरणावर भाजपा सरकारवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “नर्सरीतील मुलीवर व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ही अत्यंत संतापजनक आहे. पालकांनी शाळेत जाऊन तक्रार केली तर मुख्याध्यापिकेने ती गंभीरपणे घेतली नसल्याचे समजते. अशा मुर्दाड व बेजबाबदार शाळेवर, त्यांच्या व्यवस्थापनावर व संबंधित शाळेतील लोकांवर कठोर कारवाई करायला हवी, अशा शाळांची परवानगी रद्द करायला हवी, परिवहन खात्यांनी लक्ष घालून स्कूल बस, स्कूल व्हॅनची तपासणी करायला हवी, पण सरकार आणि प्रशासनाला त्याचे काही देणेघेणे नाही. या स्कूल व्हॅनमध्ये महिला सहाय्यक होती का? स्कूल व्हॅनला रितसर परवाना होता का? याचीही चौकशी करून पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करा. बदलापुरातील घटनेने राज्याला शिक्षणमंत्री, परिवहन मंत्री आहेत का? आणि असतील तर ते काय करतात? असा सवाल उपस्थित होत आहे असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

“बदलापूरमध्ये दीड वर्षापुर्वी असाच प्रकार घडला होता, त्यातील एका आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला पण संबंधित शाळेचा अध्यक्ष उदय कोतवाल व सचिव तुषार आपटेवर कारवाई केली नाही. तुषार आपटेला तर भाजपाने स्विकृत नगरसेवकही केले होते पण बोंबाबोंब होताच ती रद्द केली. या कोतवाल व आपटेवर कारवाई करून शाळेचा परवाना रद्द केला असता तर, एक कठोर संदेश गेला असता, अशा गुन्हेगारी प्रवृतींना जरब बसली असती पण राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त गप्पा मारतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनाही गुन्हेगारी, महिला सुरक्षा याचे काही सोयरसुतक नाही, आपली खुर्ची वाचवण्यातच त्यांचा वेळ जात आहे. बेटी बचाव, बेटी पढाव, ही भाजपाची घोषणा एक विनोद झाला आहे.” असेही खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here