महाराष्ट्र प्रदेश कार्यालय,मुंबई. महाराष्ट्रात सततच्या पावसामुळे झालेल्या ओल्या दुष्काळामुळे हजारो शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारीपणात आणखी खोल जात असून आत्महत्येच्या घटना वाढत आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आणि मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश कार्यालयासमोर मोठं आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनातील प्रमुख मागण्या शेतकऱ्यांची तात्काळ संपूर्ण कर्जमाफी,ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी किमान पाच लाख रुपयांची आर्थिक मदत. शेतकऱ्यांना पिक विमा थकबाकीची त्वरित अंमलबजावणी.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय्य भरपाई व नोकरीत प्राधान्य. शेतकऱ्यांना फसवणूक करणाऱ्या बी-बियाणे व खत कंपन्यांवर फौजदारी कारवाई.
आंदोलनादरम्यान सत्ताधाऱ्यांवर शेतकऱ्यांबद्दलच्या असंवेदनशील वर्तनावर तीव्र टीका करण्यात आली. “शेतकरी पेरणार नाही तर देश उपाशी मरेल” असा इशारा देत लवकरच मागण्या मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी असून, त्यांच्या पोटाच्या आगीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शेवटपर्यंत लढत राहील.



















