Home Uncategorized *नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्याच्या विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी २५.२५ मेट्रिक टन कच-याचे...

*नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्याच्या विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी २५.२५ मेट्रिक टन कच-याचे संकलन*

58
0

• *७३५ कामगार, कर्मचा-यांची ७३ संयंत्रांच्या सहाय्याने कामगिरी*

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी नाल्यांंमधून तरंगता कचरा काढण्यासाठी सोमवारी (दि२९ सप्टेंबर २०२५) विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात, एकूण २५.२५ मेट्रिक टन तरंगता कच-याचे संकलन करत विल्हेवाट लावण्यात आली. ७३ संयंत्रे, ७३५ मनुष्यबळ व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेची कार्यवाही करण्यात आली.

मुंबई शहर व उपनगरे परिसरातील नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ ते सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विशेष मोहीम हाती घेतली आहे. विभागीय पातळीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश नाल्यांमधील तरंगता कचरा संकलित करणे व त्याची विल्हेवाट लावणे हा आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय विभागात आजपासून या विशेष स्वच्छता मोहिमेस सुरूवात करण्यात आली. सर्व विभागांमध्ये ही मोहीम निरंतरपणे सुरू राहणार आहे. या अंतर्गत आज (दिनांक २९ सप्टेंबर २०२५) सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून मोहीम राबविण्यात आली.

आज ७३५ कामगार–कर्मचा-यांनी ७३ संयंत्राच्या सहाय्याने स्वच्छतेची कामगिरी केली. जेसीबी,डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध वाहने आणि फायरेक्स मशीन, मिस्टींग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणा दिमतीला होती. प्रत्येाक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) प्रमुख नाल्यांचे (कांदळवन क्षेत्र वगळून) तसेच, नाल्याभोवतालचा परिसर, उघडी गटारे यातील कच-याचे संकलन करण्यात आले. त्यासमवेतच, झाडलोट, टाकाऊ वस्तू हटवित, कचरा संकलन करून संपूर्ण परिसर स्वच्छ धुऊन काढण्याात आला. पर्जन्य जलवाहिनी विभाग (SWD) यांच्याद्वारे काढण्यात आलेल्या तरंगत्या कच-याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन विभाग (SWM) यांच्या मार्फत करण्यात आली.

घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पर्जन्य जलवाहिन्‍या विभागाचे मनुष्यबळ, स्वयंसेवी संस्थांचे कामगार तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग यांद्वारे विशेष मोहीम पुढील १४ दिवस दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राबविली जाणार असल्याचे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी नमूद केले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here