Home मुंबई *देवेंद्र फडणवीसांच्या कर्तृत्वाने जे नेतृत्व उभे*

*देवेंद्र फडणवीसांच्या कर्तृत्वाने जे नेतृत्व उभे*

76
0

*राहीलेय त्याविषयी गरळ ओकण्याचे काम सुरु*

*राज-उद्धव मेळाव्यावर आ. प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर*

मुंबई – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी येथे घेतलेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वक्तव्य केले. त्या वक्तव्याला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाविषयी मळमळ आणि गरळ ओकण्याचे काम सध्या सुरु आहे. दोघांच्या भाषणात महिमामंडन सुरू होते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. लोकं फळं येणाऱ्या झाडावरच दगड मारत असतात. त्यामुळे आता आपले कसे होणार? हेच आजच्या इव्हेंटवरुन दिसून आल्याचा टोला दरेकरांनी लगावला.

पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर पुढे म्हणाले की, दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकली. राज ठाकरे मराठीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत होते, स्पष्टीकरण देत होते, एकत्र येण्यासाठी आवाहन करत होते. मात्र सत्ता गेल्याचे वैषम्य उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसत होते. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंटमधून झाला. झेंडे आणायचे की नाही, वर कोणी बसायचे यावरुन सगळे कन्फ्यूज होते. राजकारणाचा दर्प या मेळाव्यात दिसत होता. उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलॉजी भिनली आहे, अशी टीकाही दरेकर यांनी यावेळी केली. तसेच मुंबई महापालिकेत कोण कंत्राटदार मोठे केलेत आणि किती मराठी होते? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती मराठी माणसाचे हित जपले? सरकार मराठी माणसांच्या हितासाठी आपल्याला समर्थन देईल, यात दुमत नक्कीच नाही. भाजपने सुद्धा मराठी माणसासाठी भूमिका घेतली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देखील देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने मिळाला आहे. मराठी भाषा भवन तुमच्या काळात उभं राहू शकले नाही हे देखील सत्य असल्याचे दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना किती जणांना वापरून फेकून दिले याची जंत्री वाचली तर कमी पडेल. भाजपने सातत्याने शिवसेनेसोबत राहून महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचा केला. मुंबईचा महापौर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बनवू शकले असते. आम्हाला वापरून फेकायचे असते तर मुंबईचा महापौर भाजपचा झाला असता. परंतु मोठे मन दाखवून फडणवीसांनी पहारेकऱ्याची भूमिका घेतली आणि महापौर शिवसेनेला बनविण्याची संधी दिली. वापरून फेकून देण्याचे काम उद्धव ठाकरेंना केले. नारायण राणे, रामदास कदम, गणेश नाईक, दिवाकर रावते अगदी राज ठाकरे यांचाही वापर केला, अशा शब्दांत दरेकरांनी उद्धव ठाकरेंना चपराक लगावली. तसेच आता महापालिका निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी वक्तव्य पुढे येतील. देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे खरे ठरले. जो विषय नाही तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे नाटक आता मराठी माणसाला व मुंबईकरांना नीट समजतेय, अशी टीका त्यांनी राज ठाकरेंच्या विधानावर केली.

*सत्तेसाठी ठाकरेंचा स्वार्थीपणा*

दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठी माणूस कुठल्या एका राजकीय पक्षाला मतदान करत नाही. विधानसभा निवडणुकीत राज्यात जे मतदान झाले त्यातून प्रचंड असा जनाधार महायुतीला मिळाला. मुंबईत भाजपचे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निवडून आले त्यांना कुणी मतदान केले? असा सवाल करत दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंना स्वार्थासाठी आता मराठी माणूस आठवलाय. २० वर्ष राज ठाकरे यांच्याकडे बघायला वेळ नव्हता. आज त्यांना सन्माननीय राज ठाकरे बोलावे लागतेय. यामध्ये ठाकरेंचा सत्तेसाठी असणारा स्वार्थीपणा दिसून येत असल्याचे दरेकर म्हणाले.

*राज्याचा पालक म्हणून मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका*

दरेकर म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी ही प्रत्येक मुख्यमंत्र्यांची असते. आंदोलनाला काहीच हरकत नाही. पण त्या आंदोलना आडून कोण आपल्या राजकीय स्वार्थासाठी गुंडगिरी करणार असेल तर ते चुकीचे आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली तर जातीय तेढ, दंगे निर्माण होतात. ते योग्य नाही. म्हणून राज्याचा पालक या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आहे.

*…तर मराठी माणसाला आनंद झाला असता*

दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भाषणात राजकीय विचार दिला असता, मराठी माणसाच्या हिताच्या गोष्टी कशा करणार आहोत याचा आराखडा दिला असता तर महाराष्ट्रातील मराठी माणसाला आनंद झाला असता. त्यांच्या भाषणात फक्त फडणवीस यांच्याविषयी झालेली कावीळ दिसून आली. ती कमी पडली म्हणून की काय या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शाळेविषयी वक्तव्य केले म्हणजे उद्धव ठाकरे किती कोत्या मनाचे आहेत हे यावरून दिसून येते.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here