Home महाराष्ट्र पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन:महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री ,दोन्ही उपमुख्यमंत्री, उपसभापती यांच्याकडून शोक...

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन:महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री ,दोन्ही उपमुख्यमंत्री, उपसभापती यांच्याकडून शोक संवेदना

76
0

*“वनसंपदेचे सजग प्रहरी होते मारुती चितमपल्ली” : महाराष्ट्राचे राज्यपाल*

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रसिद्ध निसर्गप्रेमी आणि लेखक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त समजूत दुःख झाले. आपल्या तरल आणि प्रवाही लेखनातून त्यांनी निसर्गाचे निरागस व निर्मळ विश्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले.

ज्येष्ठ वनसंरक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतरही, चितमपल्ली आयुष्यभर वन्यजीव तसेच जैवविविधतेचे संरक्षक राहिले. त्यांच्या निधनामुळे देशाने मानवतेचा आणि विशेषतः वनसंपदेचा सजग प्रहरी गमावला आहे. त्यांचे कार्य व वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि निसर्गप्रेमी जनतेला आपल्या शोकसंवेदना कळवतो, या शब्दात राज्यपालांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या .

***

*मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली*

निसर्गाला शब्दरूपांनी साजिवंत करणारे आणि मराठी साहित्यात निसर्गसंपदे विषयीच्या अक्षरधनाची भर घालून, आपली साहित्य संपदा समृद्ध करणारे अरण्यऋषी म्हणून पद्मश्री मारूती चितमपल्ली अजरामर राहतील, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली . निसर्ग आणि साहित्य क्षेत्रात व्रतस्थ राहून काम करणारे चितमपल्ली यांचे निधन महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी आहे, त्यांच्या निधनाने एक दिपस्तंभ निमाला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री  फडणवीस यांनी अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, वन विभागात काम करताना चितमपल्ली यांनी आगळा दृष्टीकोन बाळगून काम केले. त्यांनी अनेक निसर्ग किमया आपल्या निरिक्षणातून शब्दांनी चितारल्या. त्यासाठी त्यांनी गाढा अभ्यासही केला. आदिवासी तसेच राना-वनात राहणाऱ्या बांधवांकडे असलेले निसर्गाविषयीचे ज्ञान त्यांच्यामुळेच शब्दबद्ध झाले. पक्षितज्ज्ञ, निसर्गलेखक, वन्यजीवांचा अभ्यासक अशी त्यांनी ओळख मिळवली. त्यांच्यामुळे मराठी भाषेला राना-वनातील, निसर्गाशी निगडीत अस्सल असे शब्द मिळाले. त्यांच्या आत्मचरित्राचे नावच चकवाचांदण- एक वनोपनिषद असे होते. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी संस्कृतचाही अभ्यास केला. सोलापुरला झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांचे निसर्गाविषयीचे लेखन, अभ्यास- संशोधन, पक्षिकोश अशी साहित्य संपदा मराठी भाषेचे वैभव वाढणारे संचित आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक अमुल्य असा ठेवा आहे. दिवंगत चितमपल्ली यांचा सोलापूर ते नागपूर आणि पुन्हा नागपूर ते सोलापूर असा प्रवास राहीला आहे. विदर्भातही त्यांचा मोठा गोतावळा आहे. जंगलातील अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध राहीले आहेत. या सगळ्या प्रवासात ते आयुष्यभर निसर्ग आणि मराठी साहित्य क्षेत्राशी व्रतस्थ राहीले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील निसर्ग अभ्यासक, तसेच साहित्य क्षेत्रासाठीचा दिपस्तंभ निमाला आहे, ही एक मोठी हानी आहे.
दिवंगत चितमपल्ली यांचे कुटुंबिय आणि स्नेही यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना, असे नमूद करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी, पद्मश्री मारूती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली .
०००.

*निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला-पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मारुती चितमपल्ली सरांनी आपले संपूर्ण आयुष्य वन, प्राणी, पक्षी आणि निसर्गाच्या गूढ अभ्यासासाठी समर्पित केले. वृक्ष, पाने, फुलं, पक्षी, प्राणी, डोंगर, अशा निसर्गातील अनेक गोष्टींची माहिती असलेला विश्वकोश ही त्यांची ओळख होती. त्यांच्या लेखनातून मराठी साहित्यात निसर्गाविषयी संवेदनशील जाण निर्माण झाली. त्यांच्या लेखणीतून मराठी शब्दसंपदेत अनेक नवे शब्द, संकल्पना आणि अनुभवांची भर पडली आहे.

वनविभागात तीन दशकांहून अधिक सेवा बजावत असताना त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिलं. त्यांच्या प्रयत्नांतून ही अभयारण्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आदर्श ठरली.

पक्षीशास्त्र आणि वन्यजीव अभ्यासाच्या क्षेत्रात त्यांनी केवळ महाराष्ट्रापुरतेच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली वेगळी ओळख निर्माण केली. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अत्यंत प्रभावी कार्य केले.

30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हा गौरव त्यांच्या संपूर्ण कार्याचा योग्य सन्मान होता. मात्र, त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले, हे अधिकच वेदनादायी आहे. मारुती चितमपल्ली यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
*****

*निसर्गाचा वाटाड्या गेला-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मारुती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली*

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने एका मनस्वी आणि स्वच्छंदी अरण्यऋषीला आपण मुकलो आहोत. निसर्गाची ओळख करून देणारा आपला वाटाड्या गेला, अशा शब्दांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहून उपमुख्यमंत्री म्हणतात की, सर्वसामान्यांना जंगल आणि एकूणच निसर्गाविषयी गोडी लावण्याचे मोठं काम त्यांनी केलं. अरण्य सुद्धा कसं बघायचं, वाचायचं हे त्यांनी शिकवलं.

वन खात्यात काम करतांना सुद्धा ते केवळ एक शासकीय अधिकारी म्हणून राहिले नाहीत तर त्यांच्यातला चोखंदळ संशोधक त्यांनी जिवंत ठेवला. त्यांनी केवळ महाराष्ट्र हेच आपलं कार्यक्षेत्र मानलं नाही तर देशभर भटकंती केली. तेरा भाषांचे ज्ञान असलेले मारुती चितमपल्ली हे आदिवासींशी सुद्धा त्यांच्या भाषेत संवाद साधत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जंगल आणि निसर्गा विषयी त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये केलेल्या नोंदी या एक मोठं डॉक्युमेंटेशन आहे आणि अशा शेकडो डायऱ्यांच्या शास्त्रशुद्ध नोंदीमधून त्यांनी पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन केलं. निसर्ग साहित्यात मोठं योगदान केलेल्या आरोपीची संपली यांनी आपल्या आजूबाजूचे पशु पक्षी आणि निसर्ग यावर प्रेम करायला शिकवलं. त्यांचा हा विचार आत्ताच्या पिढीने पुढे नेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात.

***

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनावर डॉ नीलम गो-हे ,उपसभापती विधानपरिषद यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त

मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक, निसर्गप्रेमी आणि पर्यावरण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल विधानपरिषद उपसभापती व
साहित्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व नीलम गो-हे यांनी शोकसंदेश व्यक्त केला आहे.त्यांच्या शोकसंदेशात त्यांनी म्हटले आहे की, “आदरणीय पद्मश्री मारुती चितमपल्ली सर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समजले आणि मन सुन्न झाले. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्व, पर्यावरण क्षेत्र आणि विचारप्रवण लेखनाचा एक तेजस्वी दीप मावळला आहे.”

चितमपल्ली सरांच्या लेखनाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, “चितमपल्ली सरांनी निसर्ग, वन्यजीवन आणि मानवी मूल्ये यावर अत्यंत सखोल आणि संवेदनशील लेखन केले. त्यांच्या अनुभवसंपन्न विचारांनी आणि साहित्यसंपदेने अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचे कार्य अमूल्य आहे आणि ते सदैव प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.”

या दु:खद प्रसंगी नीलम गो-हे यांनी चितमपल्ली कुटुंबीयांप्रती व त्यांच्या सुहृदांप्रती मन:पूर्वक शोकसंवेदना व्यक्त केली असून, “ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याची शक्ती प्रदान करो,” अशी प्रार्थनाही त्यांनी आपल्या संदेशात केली.

चितमपल्ली सरांच्या निधनाने साहित्य व निसर्गप्रेमी समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here