भाजपसोबत केवळ राजकीय कारणांसाठीच ; दोन्ही पक्षांची विचारधारा समान नसल्याचे स्पष्ट! राष्ट्रवादीचा मूलमंत्र-जाहीरनाम्यात वेगळे मुद्दे!
(शीतल करदेकर)
मुंबई – महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाने आपला लोकसभा निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. या ‘मूलमंत्र’ म्हणून घोषित केलेल्या जाहिरनाम्यात भाजपसोबत केलेला घरोबा केवळ राजकीय कारणांसाठी असल्याचे आणि दोन्ही पक्षांची विचारधारा समान नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांच्या गँरंटी शिवाय या जाहीरनाम्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, शेतक-यांना हमीभाव, जातीनिहाय जनगणना, उर्दू शाळांना दर्जा असे विषय समाविष्ट केले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आमचा विजय निश्चित असल्याचे यावेळी बोलताना अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की मोदी यांचा. आत्मविश्वासक चेहराच देशाचे सक्षम नेतृत्व करू शकतो अशी जनतेत श्रद्धा आहे, इतर एकही चेहरा तसा नाही. असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रकाशित करताना त्यात संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी पक्ष मोलाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या आधारावर जाहीरनामा सादर केला असल्याचे अजित पवार म्हणाले. सध्या मतदानाची टक्केवारी कमी आहे यांचे कारण प्रचंड उष्णता असल्याचे पवार म्हणाले. भाजप पेक्षा वेगळ्या मुद्यावर जाहीरनाम्यात मुद्दे असल्याबाबत ते म्हणाले की, महायुतीत असलो तरी आमची विचारधारा सोडलेली नाही. शिवसेनेसोबत असतानाही तीच भूमिका होती सबका साथ सबका विकास या मोदींच्या घोषणेवर राष्ट्रवादीची श्रध्दा आहे.



















