मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात साजऱ्या होत असलेल्या आनंदात सहभागी न होता पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला खडे बोल सुनावले
ऑपरेशन सिंदूर नंतर राज ठाकरेंनी मोदींच्या कारभाराचे वाभाडे काढले, म्हणाले, युद्ध अन् एअर स्ट्राईक उत्तर नव्हे!
राज ठाकरे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सुरक्षा यंत्रणांच्या त्रुटींवर बोट ठेवले. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजून सापडलेले नाहीत. दरवर्षी हजारो पर्यटक जिथे जातात, तिकडे सुरक्षा का नव्हती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करुन हुडकून काढणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याऐवजी एअर स्ट्राईक करुन लोकांचं लक्ष भरकटवणं किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
सरकार जिथे चुकते तिथे चुका दाखवल्याच पाहिजेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात होते. तो दौरा अर्धवट सोडून ते भारतात आले आणि थेट बिहारला प्रचाराला गेले. ही गोष्ट करण्याची गरज नव्हती. त्यानंतर मोदी केरळमध्ये अदानींच्या बंदराचे उद्घाटन करायला गेले. यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्हेव कार्यक्रमाला उपस्थिती लावली. इतकी गंभीर परिस्थिती असताना या गोष्टी टाळता आल्या असत्या, असे खडे बोल राज ठाकरे यांनी सुनावले.
नाक्यानाक्यावर ड्रग्ज मिळतायत. ते येतायत कुठून? का येतायत? लहान लहान पोरं ड्रग्ज घेतायत. शाळेतली पोरं ड्रग्ज घेतायत. ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही. तुम्ही नेमकी काय पावलं उचलतायत, इतके दिवस जे कार्यक्रम मोदींनी घेतले त्याची गरज नव्हती, असेही राज ठाकरेंनी म्हटले
