*राज्यपालांच्या हस्ते आरोग्य, शाश्वत विकास व सुशासन क्षेत्रातील संस्थांना यशराज भारती सन्मान प्रदान*
*भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याचे राज्यपालांचे आवाहन*


भ्रष्टाचाराचा फटका श्रीमंतांपेक्षा गरिबांना अधिक बसतो, हे वास्तव आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करणे आवश्यक आहे असे सांगून समाजाने सुशासन व नीतिमूल्यांचा पुरस्कार केल्यास, खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन घडेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते आरोग्यसेवा, शाश्वत विकास व सुशासन या क्षेत्रात मूलभूत स्तरावर कार्य करणाऱ्या देशातील तीन सेवाभावी संस्थांना तिसरे ‘यशराज भारती सन्मान’ रविवारी (दि. २०) एनसीपीए मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ८ – ९ टक्के इतकी असून राज्यातील सेवाभावी डॉक्टरांनी तसेच विशेषज्ञांनी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आदिवासी भागातील बांधवांपर्यंत पोहोचवल्यास तेथील जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी छत्तीसगड येथील ‘जन स्वास्थ्य सहयोग’ या संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
आज राज्यातील शाळांची संख्या फार मोठी असली तरी देखील शिक्षणाचा स्तर घटत आहे असे सांगून शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे विशषतः मुलींचे शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यांचा उच्च शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमार्फत आपण ‘शाळा संपर्क’ अभियान राबवित असल्याचे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी एकलव्य आदर्श शाळांना भेटी द्याव्या तसेच तेथे शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यास प्रोत्साहित करावे या दृष्टीने प्रयत्न होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व वसतिगृह सुविधा मोफत असल्याचे त्यांनी सांगितले.
यशराज रिसर्च फाऊंडेशन या संस्थेने प्रसिद्धीपासून दूर मूलभूत स्तरावर कार्य करणाऱ्या आरोग्य, शाश्वत विकास व सुशासन या विषयात कार्य करणाऱ्या संस्थांना पुरस्कारासाठी निवडल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.
छत्तीसगड येथील ‘जन स्वास्थ्य सहयोग’ या संस्थेला आदिवासातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टर्सच्या मदतीने घरपोच आरोग्य सेवा दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तर शिक्षण क्षेत्रातील ‘प्रथम एजुकेशन फाऊंडेशन’ या संस्थेला शिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत विकासात योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय सूचना केंद्राने (एनआयसी) विकसित केलेल्या ‘सर्व्हिसेस प्लस’ या डिजिटल प्लॅटफॉर्मला देखील यशराज भारती सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जी – २० चे शेरपा अमिताभ कांत, यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा दीपाली भानुशाली, माजी सनदी अधिकारी व लोकपाल सदस्य डी के जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, यशराज रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त सुभाष मुंदडा, यशराज भारती सम्मान निवड समितीचे अध्यक्ष प्रा. राम चरण, आदी उपस्थित होते.
*Maharashtra Governor presents Yashraj Bharti Samman to 3 Change Maker organisations*
Maharashtra Governor C.P. Radhakrishnan presented the third ‘Yashraj Bharti Samman’ awards to three service organizations in India working at the grassroots level in the fields of healthcare, sustainable development, and good governance.
The awards were conferred to ‘Jan Swasthya Sahayog’ from Chhattisgarh, ‘Pratham Education Foundation’ and the ‘Services Plus’ platform developed by the National Informatics Centre at NCPA Mumbai on Sun (20 April).
Former Speaker of Maharashtra Legislative Assembly Dilip Walse Patil, G-20 Sherpa of India Amitabh Kant, President of the Yashraj Research Foundation Deepali Bhanushali, former civil servant and Lokpal member D.K. Jain, Secretary to the Governor Dr. Prashant Narnavare, Yashraj Research Foundation Trustee Subhash Mundra and Chairman of the Jury of Yashraj Bharti Samman Prof. Ram Charan were present.






















