मुंबई,
शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे इशारा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा तीव्र विरोध
राज्य सरकारने मराठी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या भाषिक, सांस्कृतिक व शैक्षणिक स्वायत्ततेवर सरळसरळ आक्रमण आहे. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला नुकताच केंद्र शासनाने ‘अभिजात भाषा’ म्हणून सन्मान दिला आहे. अशा काळात मराठीच्या प्रचारासाठी धोरण आखण्याऐवजी राज्य सरकार दुसऱ्याच भाषेचा अनावश्यक प्रचार करत आहे, हे अतिशय दुःखद व चिंताजनक आहे.
या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्षाचे प्रवक्ते व युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून स्पष्ट इशारा दिला आहे की, हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले जाईल.
मराठी भाषेचा अपमान – भविष्यातील पिढ्यांना मूळ भाषेपासून तोडण्याचा प्रकार
महाराष्ट्र शासनाने यापूर्वी इयत्ता बारावीपर्यंत सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. पण आजतागायत त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. शासनाने त्या दिशेने कार्यवाही करणे अपेक्षित होते. परंतु उलटपक्षी, मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीने लागू करत मराठीला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि समाजजीवनाचा आत्मा आहे. ही भाषा पिढ्यानपिढ्या आपल्या मूल्यांची परंपरा पुढे नेत आलेली आहे. तिचं जतन व संवर्धन हे कोणत्याही जबाबदार सरकारचं कर्तव्य असतं. परंतु सध्याचं राज्य सरकार मात्र या जबाबदारीपासून पळ काढताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारपक्षाच्या प्रमुख मागण्या मराठी शाळांमध्ये हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा. इयत्ता बारावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी मराठी विषय सक्तीचा करावा.मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या अनुषंगाने धोरणात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी. सर्व शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये मराठी वाचनालये, साहित्य उत्सव, भाषिक चळवळी सुरू कराव्यात.शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषेचा गाभा टिकवण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करावी.
मराठीचा वापर, विकास आणि जनजागृती वाढवण्यासाठी सरकारने कृतीशील भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनोख्या पद्धतीने आंदोलन करावे लागले.
– ॲड. अमोल मातेले
प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष
युवक राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्ष






















