*महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर!*
*सत्ताधारी-विरोधकांतील वाटपाचा तिढा अखेर सुटला!*
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी अखेर विविध समित्यांची घोषणा करण्यात आली. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (मविआ) यांच्यातील राजकीय समीकरणांचा विचार करत समित्यांच्या प्रमुखपदांचे सन्मानजनक वाटप करण्यात आले.
यात महायुतीने आपले वर्चस्व दाखवले असले तरी; विरोधकांनीही काही प्रमाणात आपली ठळक उपस्थिती दर्शवली असल्याने या समित्यांच्या कामकाजातून राज्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीत राहून विरोधी पक्षनेतेपदाने हुलकावणी दिलेल्या काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना महायुती सरकारने विधिमंडळाच्या सर्वोच्च पदांपैकी एक अशा “लोकलेखा समिती” च्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. या पदाला कॅबिनेट मंत्री दर्जा असतो, मात्र सरकारने तो दिला आहे की नाही, हे अद्याप अस्पष्ट असले तरी त्यांना स्वतंत्र कार्यालय आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा ताफा मिळणार हे निश्चित आहे.
सत्ताधारी महायुतीकडे प्रचंड बहुमत असतानाही सरकार स्थापनेनंतर तब्बल १०० दिवस समित्यांचे वाटप का लांबणीवर टाकले गेले? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. विशेष सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधी पक्षाची आक्रमक भूमिका आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विलंब-तंत्रा
मुळे ही नियुक्ती लांबणीवर पडली !
मात्र विरोधकांतील विशेषतः काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते, त्यामुळेच या नियुक्त्या करणे सरकारला भाग पडले हे निश्चित!
*विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे वाटप*
* *नियम समिती – विधानसभा अध्यक्ष एड राहुल नार्वेकर*
* *विधानमंडळ माजी सदस्य निवृत्ती वेतन समिती – उपमुख्यमंत्री अजित पवार*
* *विधिमंडळ विशेषाधिकार समिती – शिवसेना (शिंदे गट) आ. नरेंद्र भोंडेकर*
* *सभागृह पटलावर कागदपत्रे ठेवण्याबाबतची तदर्थ समिती*- *राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आ. अण्णा बनसोडे*
• *आमदार निवास व्यवस्थापन समिती – भाजप आ. शिवेंद्रराजे भोसले*
• *धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समिती – भाजप आ. आशिष जयस्वाल*
• *आहार व्यवस्था समिती – शिवसेना (शिंदे गट) आ. बालाजी किणीकर*
• *आश्वासन समिती – भाजप आ. रवी राणा*
• *सदस्य अनुपस्थिती समिती – भाजप आ. डॉ. किरण लहामटे*
• *अशासकीय विधेयके आणि ठराव समिती – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आ. चंद्रदीप नरके*
*महायुतीचे सत्ताबळ प्रभावी*
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे बहुमत असतानाही तीनही पक्षांना समान वाटप करण्यात आले,असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
राहुल नार्वेकर आणि अजित पवार यांसारख्या नेत्यांना महत्त्वाच्या समित्यांची जबाबदारी देऊन महायुतीने आपले वर्चस्व गडद केले आहे.
* *’आमच्याकडे दुर्लक्ष”, विरोधकांचा आरोप*
विजय वडेट्टीवार यांना “लोकलेखा समिती” देऊन काँग्रेसला शांत करण्याचा प्रयत्न झाला असला तरी, इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये विरोधकांना उचित स्थान मिळाले नसल्याचा, आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी केला आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले म्हणतात, “सत्ताधाऱ्यांनी समित्यांचे वाटप करताना लोकशाहीचा विचारच केलेला नाही. हे अधिवेशन जनतेच्या प्रश्नांपासून दूर राहिले.”
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांनी आपल्याच नेत्यांना समित्या दिल्या आहेत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. लोकलेखा समिती सोडली तर मविआला काहीच मिळाले नाही.”
*सक्षम नेत्यांच्या नियुक्तीचा महायुतीचा दावा*
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सर्व समित्या सक्षम नेत्यांकडे दिल्या आहेत. आमचे सरकार प्रगतीकडे जाणारे आहे! या समित्या विकासाला गती देतील.”
तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “माजी सदस्यांचे निवृत्ती वेतन हा संवेदनशील मुद्दा असून त्यावर आवश्यक निर्णय घेतले जातील.”
*राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता*
या नियुक्त्यांमुळे राजकीय संघर्ष तीव्र होऊ शकतो. वादग्रस्त आ. रवी राणा यांना ‘आश्वासन समिती’ दिल्याने विरोधक नाराज आहेत.तर दुसरीकडे, विजय वडेट्टीवार यांच्याकडे “लोकलेखा समिती” आल्यामुळे सरकारच्या आर्थिक निर्णयांवर टीकेचा भडिमार होणार का हाही प्रश्न आहेच.


















