ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ५४ वसतिगृहे सुरु; मुख्यमंत्र्याकडून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे कौतुक
मुंबई, दि. 5 : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात वर्षभरात 54 वसतीगृहे सुरु करण्यात आली आहेत. तर आणखी 18 वसतिगृहे येत्या जूनअखेर सुरू होतील, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच वर्षभरात 54 ओबीसी वसतीगृह सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. सावे यांचे सभागृहात अभिनंदन केले.
विधानपरिषदेत सदस्य अभिजीत वंजारी यांनी ओबीसी वसतिगृह आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरावेळी ते बोलत होते.
मंत्री सावे म्हणाले की, राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित 72 वसतिगृहांपैकी 54 वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये 26 मुलांची आणि 28 मुलींची वसतीगृहे आहेत. उर्वरित वसतीगृहे या शैक्षणिक वर्षांपासून सुरु होतील. याशिवाय, ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मुंबई, आणि महानगर परिरसरातील इमारतीसाठी शासनाने भाडे वाढवून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उर्वरित 18 वसतिगृहे येत्या शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेच जून-जुलैमध्ये सुरू होतील. सर्व वसतिगृहे स्वमालकीची असावीत यासाठीही विभाग प्रयत्नशील आहे. तसेच वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा निधी थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. यंदाच्या वर्षी बँक खात्यांमधील काही त्रुटीमुळे हा निधी वितरणास वेळ लागला आहे. परंतू पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निधी वेळेत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असेही श्री. सावे यांनी सांगितले.
0000
वरळी येथील शासकीय वसाहत इमारतींच्या संरचनात्मक परीक्षण दुरूस्तीची कामे प्रगतीपथावर – दुग्धविकास विकास मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. 5 : वरळी येथील शासकीय वसाहतीतील इमारतींचे संरचनात्मक परीक्षण कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वरळी यांचेमार्फत करण्यात आले असून, त्यानुसार इमारतींच्या देखभाल दुरूस्तीकरिता व धोकादायक पाण्याची टाकी निष्कासित करण्यात आली आहे. दुरूस्तीची कामे सुरु असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य सुनिल शिंदे, मिलिंद नार्वेकर यांनी वरळी दुग्धशाळा वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
दुग्धविकास मंत्री श्री.सावे म्हणाले, दुग्धशाळेतील कर्मचाऱ्यांना मोफत घरे देण्याबाबत शासनाचे कोणतेही धोरण नसून वरळी वसाहतीतील इमारती कमकुवत झाल्याने इमारतीतील कर्मचाऱ्यांना पर्यायी सोय म्हणून वरळी येथील उपलब्ध असलेल्या पर्यवेक्षीय तसेच कामगार वसाहतीतील शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे श्री.सावे यांनी सांगितले.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य विक्रम काळे, प्रवीण दरेकर, सुनील शिंदे, भाई जगताप अभिजित वंजारी यांनी चर्चेत सहभाग घेतला.
0000


















