Home महाराष्ट्र *”बालकांचे संरक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता हा आमचा प्राधान्यक्रम” – शालेय शिक्षण मंत्री...

*”बालकांचे संरक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता हा आमचा प्राधान्यक्रम” – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे* सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने पालक व शिक्षकांनी सतर्क राहावे” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

173
0

*”सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने पालक व शिक्षकांनी सतर्क राहावे” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

*महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या ‘बालरक्षा अभियान’चा उद्घाटन सोहळा संपन्न*

मुंबई दि. १७ : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजित ‘बालरक्षा अभियान’चा उद्घाटन सोहळा १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रमुख उपस्थित राहून विशेष मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये त्यांनी ‘स्कूल गाईडलाईन आणि सायबर क्राईम’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ‘बालरक्षा अभियान प्रशिक्षण पुस्तिका’ आणि नूतनीकरण केलेल्या ‘बालस्नेही चिराग ॲप’ चे उद्घाटन करण्यात आले. तसेच, बालहक्क जागरूकतेसाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृतीपर पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, “बालकांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये प्रभावी उपाययोजना राबविणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकार शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी कटिबद्ध असून, शिक्षण क्षेत्रातील काही समित्या पुनर्रचित करण्यात येणार आहेत. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात सुरक्षिततेसाठी आवश्यकतेनुसार दामिनी पथक व पोलीस बंदोबस्त ठेवण्याचाही विचार आहे.”

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सायबर सुरक्षेच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, “आजच्या डिजिटल युगात बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यांना कोणत्या वेबसाईट्सवर प्रवेश असावा यावरही चर्चा होणे आवश्यक आहे. तसेच, ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टमच्या माध्यमातून शाळा आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याची गरज आहे.”

या अभियानाच्या माध्यमातून बालकांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, शाळांमध्ये योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाच्या मदतीने बालहक्क संरक्षणाच्या उपाययोजना राबविणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

त्याचबरोबर सामाजिक संस्था शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे प्रतिनिधी, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आयोग सदस्य अॅड. जयश्री पालवे, सायली पालखेडकर, प्रज्ञा खोसरे, चैतन्य पुरंदरे आणि शिवसेना महिला विभाग प्रमुख शितल बित्रा हे सर्व प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड. संजय सेंगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here