Home मुंबई आणखी किती अपमानित जगायचं, शांतपणे झिजून मरायचं?शीतल करदेकर

आणखी किती अपमानित जगायचं, शांतपणे झिजून मरायचं?शीतल करदेकर

150
0

माननीय नामदार एकनाथ शिंदे दादासाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

विषय: आणखी किती अपमानित जगायचं, शांतपणे झिजून मरायचं?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दादा! दादा म्हणते कारण सध्या लाडकी बहीण आणि लाडका दादा याचा ट्रेंड चालू आहे आणि मी जेव्हा उपोषण सोडलं अकरा जुलै रोजी त्यावेळी आपण विनंती केली होती, ‘ताई उपोषण थांबवा पत्रकारांसाठी महामंडळ आपण करणार आहोत’ आणि आमच्या पत्रावर माहिती जनसंपर्क प्रधान सचिवांना निर्देश दिले की, यावर चर्चा करावी आणि आपले माध्यम सल्लागार मा विनायक पात्रुडकर यांना सांगितले की ‘ताई सोबत एका आठवड्यात बैठक घ्या’
खूप आनंद वाटला की , कोणीतरी संवेदनशील व्यक्ती, आपलं घरचं माणूस, आपल्या लोकांच्या वेदना ऐकून आपल्यासाठी खंबीरपणे आपल्या मागे उभा आहे.
आणि सर्वत्र बातम्या झाल्या मुख्यमंत्र्यांनी बहिणीला भेट दिली .
मात्र नियतीच्या मनात काही वेगळं असावं…दिवसामागून दिवस गेले. अगदी ७० दिवस झाले असावे, आमच्या सोबत एकही बैठक संबंधितांनी घेतली नाही .
कारण अशी माहिती कळते की, ही जबाबदारी आमची नसून कामगार विभागाची आहे’ असं यांनी स्वतःच ठरवलं! का बरं? का माझी भूमिका पाच मिनिट ऐकून घ्यावीशी वाटलं नाही?
आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की, जेव्हा करोना काळात रंंगकर्मीसाठी महामंडळ बनवण्यास सुरुवात झाली त्यावेळेला त्यावेळचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी हा विषय कामगार विभागाचा आहे म्हणून हात झटकले नव्हते तर, सांस्कृतिक मंत्र्यांनी तितक्याच ताकदीने काम करून कामगार मंत्र्यांनाही सहकार्य केले होते आणि त्यामुळे रंगकर्मींचे महामंडळ बनले!
मग जर माहिती जनसंपर्क विभागाची ही जबाबदारी आहे तर हा विषय थेट कामगार विभागाचा आहे अशी जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्याची भूमिका का झाली असावी ? असं खूप ..आपणं कसे शुल्लक असल्याचे समजते तेव्हा शरीरातले साखरेचे किडे वेगाने वाढतात.
प्रचंड आजारी असताना( शुगर ४०० असताना दोन दिवसाच्या उपोषणाने ती १०० च्या खाली जाऊन मला त्रास झाला) मी समस्त प्रसार माध्यमकर्मींच्या सन्मानासाठी माझा जीव पणाला लावला त्याची जाणीव सरकारात आणि प्रशासनात बसलेल्या किती जणांना आहे हे मला माहिती नाही ;मात्र बहिणीसाठी दारोदारी फिरणारे मुख्यमंत्री आपण
जेव्हा चॅनलवर दिसता,रस्त्यात अपघात झालेल्या व्यक्तीसाठी आपण मदतीला धावता हे पाहतो तेव्हा बरं वाटतं ;पण ते तेवढ्यापुरतं असतं साहेब!
आमच्या जखमा, आमच्या वेदना, आमच्या जगण्यातील अस्वस्थता कायम आहे; कारण आमच्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांकडे वेळ नाही, कारण चौथा स्तंभ म्हणून काम करणारा पत्रकार सन्मानाने किती जगतो याचा विचार किंवा चिंतन करून काम करण्याची गरज आज कुणालाही वाटत नाही ,याची खंत मनाला आणि शरीराला पोखरते !
माझ्या स्वभावाप्रमाणे मी धडाडीने पुन्हा आंदोलनाला उतरले असते किंवा उपोषणाला बसले असते तर; माझी तुलना जरांगे पाटील किंवा इतर कोणाबरोबर झाली असती आणि चेष्टाही झाली असती!! दुसरं असं की मी जन्माने जरी ९६ कुळी मराठा असले तरी, जातीचे लेबल लावण्याचा मला अधिकार नाही आणि मी तो लावून घेणार नाही! लिंगभेद मी मानत नाही आणि त्याचेही पत्ते मी माझ्या क्षेत्रात खेळत नाही! लाचारी तर अजिबात करत नाही!
कधी कोणी सन्मानाने बोलवलं तरच पाहुणचार घ्यावा अन्यथा आपल्या कामात, अभ्यासात आणि संघटनेत काम करून सतत सर्वांच्या हिताचा विचार व कृती करावी इतकच मला जमतं!
… पण आज लिहावसं वाटलं कारण, मी पुन्हा उपोषण करू नये म्हणून माझी काळजी घेणारे आणि चिंता करणारे सगळेच मला बोलतात! त्यामुळे मी जरी शांत असले तरी माझा आजार हा मला या सगळ्या विचारांनी पोखरतो आहे.
याची जाणीव मला रोजच होते !
याहून भयंकर परिस्थिती अशी की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गणपतीसाठी अनेक पत्रकारांना निमंत्रण दिले गेले, मात्र माझं नाव या निमंत्रितांतून वगळलं ! ते का याचा विचार मी करत राहिले कारण मी संवेदनशील आहे !
मुख्यमंत्र्यांचा बंगला हा फक्त एका व्यक्तीचा नसतो तर समाजातील सर्वसामान्य लोकांनी येऊन आपल्या अडचणी सांगून त्यांची कामं सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी असतो आणि पत्रकारिता क्षेत्राच्या सन्मानासाठी
लढणाऱ्या मला या यादीतून गाळल गेलं; ते का याचा विचार मी अजिबात करत नाही,पण आपलं मन हे विचार करत राहतं की, माझं उपोषण हे इतकं का शुल्लक होतं की ,संबंधित अधिकारी आणि व्यवस्थेतील माननीय व्यक्तींना तो राजकीय ड्रामा वाटावा?
इतिहासात आजवर माझ्यासारखे उपोषण कुणी केलं नसेल ते करण्याचं धाडस मी केलं!
… तर मला वाटलं की ‘एकच नाथ’ म्हणून जाहिरातीत दिसणारे ,बहिणींच्या घरी जाऊन गप्पा मारणारे एकनाथ दादा मला दिलेला शब्द विसरले की, तो शब्दच खोटा होता असे अनेक प्रश्न मनात येतात !
हे प्रश्न सतवण्याचे कारण आज-काल अनेक महामंडळ होत आहेत ,अगदी रिक्षा टॅक्सी वाल्यांचे महामंडळ, परशुराम महामंडळ अशी कितीतरी महामंडळ झपाझप होत गेली आणि मनात सतत वेदना होत राहिल्या की आपण स्वतःला चौथा स्तंभ म्हणून मिरवतो पण खरोखरच या समाजात आणि या राजकीय वर्तुळात आपल्याला काय किंमत आहे हे दिसतय !
कारण पत्रकार सन्मान योजनेचा लाभ किती कमी जणांना होतो आणि कोणाला होतो? पत्रकार सन्मान योजनेचे वाढलेले पैसे गरजवंत पत्रकारांना का मिळत नाही ?
शंकरराव चव्हाण मंडळाचे महामंडळ का होत नाही?
म्हणे कोर्टात केस चालू असलेल्या बोगस संघटनेचे १९ सदस्य अधीस्विकृती समितीत घेऊन परत त्या जीआरवर कोर्टाच्या अधीन राहून ही सदस्य नियुक्ती करतो असं लिहिणारे अधिकारी किती महान असतील याचा विचारही मन करत राहतं.
अधिस्विकृतीची मागील मागील काही वर्षाची छाननी केली तर समितीवर असणारे आणि अधिस्विकृती मिळालेले यांचा अभ्यास केला तर भरपूर धक्कादायक माहिती समोर येऊ शकते आणि हे सगळं सहन करत आमच्यासारखे हजारो पत्रकार जगण्यासाठी, सन्मान मिळवण्यासाठी सरकार आपल्यासाठी काही करेल . मालक व श्रमिक पत्रकार तसेच एकूण या क्षेत्रात सुसंगती लावून घेण्यासाठी काही यंत्रणा तयार करेल अशी मानसिकता ठेवणे चूक नाही ; मात्र केवळ आपल्या स्वार्थासाठी विचार करणारे लोक या क्षेत्रात वाढले आणि त्यांचा सोयीने वापर करून त्यांच्यापुढे तुकडे टाकणारे वाढले, त्यामुळे आपण उपोषण कोणासाठी करायचे हा विचार मनात येत असताना आपण केलेल्या उपोषणाची किंमत जर सरकार दरबारी शून्य असेल तर यासारखा दुसरा अपमान नाही आणि म्हणून आतून पोखरणारे मन नकळत शरीरावर परिणाम करत राहते!
याचा विचार न करता जगत राहायचं आताशा कठीण होत चाललंय कारण या आजारावर कोणताही औषध नाही!
मी दादा म्हणणार नाही कारण मला दिलेला शब्द राज्याच्या मुख्य पदावर बसलेल्या व्यक्तीने पाळलेला नाही! आपल्या प्रसिद्धीसाठी आणि प्रचारासाठी ते व्यग्र आहेत!
मला वर्षा बंगल्यावर येण्यासाठी चाळणी लावू शकतात मात्र माझी अस्वस्थता आणि इतक्या मोठ्या व्यक्तीने केलेला माझा अपमान माझ्यासह मिटणार नाही तर तो काळाच्या ओघात आणखी गडद होत जाईल .
लाचारी वाईट असते आणि अपमानित जगणं तर त्याहून वाईट.
भल्याभल्यांनी माझ्या या विषयासाठी मला टाळलं कारण शीतल करदेकर काहीतरी भयंकर मागण्या करतेय, तिने उपोषण केले हा कदाचित त्यांच्यासाठी मी केलेला गुन्हा असावा!
मात्र या विषयावर संवेदनशीलपणे तोडगा काढण्याचे धाडस करण्यास कोणाला वेळ नाही!

कारण या क्षेत्रातील बहीण-भाऊ फक्त भेटीगाठी देण्यापुरतीच असतात असा यांचा समज आहे!
असो जसजसे दिवस जातील तसतसे याचे परिणाम दिसत राहतील !
माझे उपोषण हा खुळेपणा होता असे म्हणणारे वाढत राहतील आणि माझा अपमान होत राहील!
महाराष्ट्राच्या मुख्य पदावर बसलेल्या व्यक्तीला हे कसे वाटेल हे मला माहित नाही; पण माझी अस्वस्थता माझा न्याय करेल असं निश्चित वाटतं !याचा फायदा मला नाही झाला तरी इतरांना होईल अशा आशेवर सतत काम करत राहाणं हे मी माझं कर्तव्य समजते .वादळं येतच रहातील…सामोरं जायचं…वरुन साद आली की निघून जायचं!

शीतल करदेकर
संस्थापक अध्यक्ष
मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here