Home Trending Now महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची पाहणी

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची पाहणी

110
0

आपटे कोणी शोधला? नेव्हीला त्याची माहिती कोणी दिली? तो कल्याणचाच कसा? या पुतळ्याचे टेंडर न काढता त्यालाच कसे कंत्राट मिळाले?

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा संतप्त सवाल

सरकारने जबाबदारी झटकू नये, शिवप्रेमींची माफी मागावी – जयंत पाटील

मालवण :-

महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावरील घटनास्थळी भेट दिली तत्पूर्वी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की की, फक्त आठ महिन्यांपूर्वी बांधलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. हा पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे. मुख्यमंत्री म्हणतात प्रचंड वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पुतळा पडला. तसं असतं तर दोन-तीन झाड पडली असती पण तसं न होता फक्त पुतळा पडला याचा अर्थ पुतळ्याच काम सदोष होतं. अपरिपक्व माणसाला पुतळ्याचे काम दिले. दीड – दोन फुटांचे पुतळे तयार करणाऱ्या व्यक्तीला ३५ फुटाच्या पुतळ्याचे काम दिले. सरकार म्हणतंय पुतळा नेव्हीने बांधला आहे. सरकारला हात झटकून चालणार नाही, यात सरकार जबाबदारी ही सरकारची आहे. नेव्हीच्या लोकांनी फक्त पुतळा तिथे बसवला. हा शिल्पकार आपटे कोणी शोधला? कोणी नेव्हीला त्याची माहिती दिली? तो कल्याणचाच कसा? या पुतळ्याचे टेंडर काढले गेले नाही मग त्यालाच कसे कंत्राट मिळाले? या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

सरकारने कोणतीही शहानिशा न करता गुन्हा कसा दाखल केला? गुन्हा दाखल करणे म्हणजे आपण काही तरी करतोय हे दाखवण्याचा केविलवाणा खटाटोप सरकार करत आहे अशी टीका असताना सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. सरकार काम फक्त टेंडर काढणे, जवळच्या लोकांना कंत्राट देणे, त्या कामाचा इव्हेंट करणे त्यापलीकडे सरकार काहीच करायला तयार नाही असा आरोप त्यांनी केला तसेच सरकारने राज्यभरातील शिवप्रेमींची माफी मागावी असेही ते म्हणाले.

दरम्यान या प्रकरणाची जर सरकारला खरंच चौकशी करायची असेल तर दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांनी बसून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची निवड करावी आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे हे सरकार जाईल आणि रयतेचे राज्य येईल

स्थानिक मंत्री सांगतायत की, ‘या वाईटातून काहीतरी चागलं होईल’. मला अशा मंत्र्यांच्या बुध्दीची कीव वाटते. मंत्री महोदय नक्कीच चांगलं होणार, शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे हे सरकार जाईल आणि रयतेचे राज्य येईल. ज्यांना 28 फुटाचा व्यवस्थित पुतळा उभारता आला नाही ते आता 100 फुटाची चर्चा करतायत असा टोलाही शेवटी त्यांनी लगावला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here