Home मुंबई *महा वॉकेथॉनमधून जलयुक्त महाराष्ट्राचा संकल्प; राज्यभर दोन लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग*

*महा वॉकेथॉनमधून जलयुक्त महाराष्ट्राचा संकल्प; राज्यभर दोन लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग*

44
0

*महा वॉकेथॉनमधून जलयुक्त महाराष्ट्राचा संकल्प; राज्यभर दोन लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग*

मुंबई, दि. २१ : माती जपा, पाणी वाचवा आणि जलयुक्त महाराष्ट्र घडवा, या संदेशाने आज राज्यभर ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या जलसंधारण दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमाला राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत जलसंधारणाची लोकचळवळ उभारण्याचा संकल्प केला.

मुंबईतील वरळी येथील सागरी किनारा रस्त्यालगत प्रोमेनेड परिसरात राज्यस्तरीय महा वॉकेथॉनचा शुभारंभ झाला. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तुळशी रोपाला जल अर्पण करून जलपूजन, जल व मृदसंधारणाची शपथ आणि महा वॉकेथॉनला झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.
यावेळी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, गायक संजू राठोड,अभिनेते पुष्कर श्रोत्री, जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल, संजीव-श्रवण, अनिल सिंग, झहीर शेख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

“माती आणि पाणी हे महाराष्ट्राच्या भवितव्याशी जोडलेले विषय आहेत. जलसंधारणासारख्या महत्त्वाच्या विषयावर केवळ मंत्रालयात बैठका न घेता लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘महा वॉकेथॉन’च्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून, जलयुक्त महाराष्ट्राच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.” असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले.

स्व. सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचाराला लोकचळवळीचे स्वरूप दिले. त्यांच्या जलसंधारणाच्या कार्याचा आदर्श घेत भविष्यातील पिढ्यांसाठी माती आणि पाण्याचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे मंत्री राठोड यांनी सांगितले. युवकांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी ‘महा वॉकेथॉन’ हा माती वाचवा, पाणी जिरवा आणि जलसंधारणाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणारा अभिनव उपक्रम असल्याचे सांगितले. पाणी ही प्रत्येकाची गरज असून, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन जलसंधारणाचा विचार जनमानसात रुजविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन केले. पावसाचे पाणी वाहून जाताना सुपीक मातीही वाहून जाते. त्यामुळे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे आणि मातीचे संवर्धन करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. स्व. सुधाकरराव नाईक यांचा ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश प्रत्यक्षात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तीन किलोमीटर च्या या महा वॉकेथॉनमध्ये मंत्री संजय राठोड यांनी सहभागी नागरिकांसमवेत संपूर्ण अंतर पायी चालून पूर्ण केले. तसेच विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव आणि मान्यवरांनीही वॉकेथॉनमध्ये सहभागी होत नागरिकांचा उत्साह वाढविला.

जलसुरक्षेचा संदेश देणाऱ्या गीतांच्या सादरीकरणासह सहभागींसाठी ईश्वरी चिठ्ठीच्या माध्यमातून बक्षीस वितरण करण्यात आले. राज्यातील ३५ जिल्ह्यांत एकाच वेळी झालेल्या या उपक्रमातून माती व पाणी संवर्धनाचा संदेश व्यापक लोकचळवळीत रूपांतरित करण्याचा संकल्प करण्यात आला.
०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here