Home मुंबई *महिला प्रवाशांसाठी सुरक्षित एस.टी. सेवेकडे महत्त्वपूर्ण पाऊल : सात दिवसांत अहवाल देण्याचे...

*महिला प्रवाशांसाठी सुरक्षित एस.टी. सेवेकडे महत्त्वपूर्ण पाऊल : सात दिवसांत अहवाल देण्याचे प्रताप सरनाईक यांचे निर्देश*

32
0

*महिला प्रतिनिधी, सामाजिक संस्था व वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांना आश्वासन*

मुंबई, दि. १७ ऑगस्ट २०२६ : राज्यातील एस.टी. बसस्थानके आणि एस.टी. प्रवास महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी अधिक सुरक्षित व सुविधायुक्त करण्याच्या मागणीची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक दखल घेतली आहे. बसस्थानकांवरील सुविधा व आवश्यक सुधारणांचा आढावा घेऊन सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी परिवहन विभाग व एस.टी. महामंडळाच्या प्रशासनाला दिले आहेत.

विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात मंत्री सरनाईक यांना निवेदन दिले. महिला प्रतिनिधींनी राज्यातील २० जिल्ह्यांमधील ८७ बसस्थानकांची पाहणी केली असून स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा रक्षक, पोलीस गस्त, सीसीटीव्ही आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह या सुविधांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

सर्व प्रमुख बसस्थानकांचे महिला सुरक्षा ऑडिट करणे, चालक-वाहक व सुरक्षा कर्मचाऱ्यांना लिंगसंवेदनशीलतेचे प्रशिक्षण देणे, छळाच्या घटनांमध्ये तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्पष्ट SOP तयार करणे, हेल्पलाईन व तक्रार यंत्रणेची माहिती प्रदर्शित करणे आणि विभागीय स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली. अक्षरा सेंटरच्या सह-संचालिका डॉ. नंदिता शहा यांनी सार्वजनिक वाहतुकीतील महिला सुरक्षेबाबत केलेल्या कामाचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

महिला प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच परिवहन विभाग आणि एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विशेष आढावा बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले. तसेच, पुण्यातील परिवहन व प्रवासी सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी केलेल्या तत्पर कार्यवाहीबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे आभार मानले.

“सुरक्षित प्रवास हा महिला प्रवाशांचा अधिकार आहे. सर्व संबंधित विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून कालबद्ध कृती आराखडा राबविल्यास राज्यातील एस.टी. सेवा अधिक सुरक्षित व प्रवासीस्नेही होईल,” असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here