Home मुंबई *डिजिटल युगातही आपल्या परंपरा… बोलीभाषा… लोककला… लोकसंगीत… हस्तकला जगल्या पाहिजेत आणि सांस्कृतिक...

*डिजिटल युगातही आपल्या परंपरा… बोलीभाषा… लोककला… लोकसंगीत… हस्तकला जगल्या पाहिजेत आणि सांस्कृतिक वारसा पुढे चालला पाहिजे – सुनेत्रा पवार*

10
0

*डिजिटल युगातही आपल्या परंपरा… बोलीभाषा… लोककला… लोकसंगीत… हस्तकला जगल्या पाहिजेत आणि सांस्कृतिक वारसा पुढे चालला पाहिजे – सुनेत्रा पवार*

*नरहरी झिरवाळ यांच्यामार्फत जागतिक आदिवासी दिनानिमित्त वनरंग सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन…*

 

मुंबई दि. ७ ऑगस्ट – डिजिटल युगातही आपल्या परंपरा जिवंत राहिल्या पाहिजेत… आपल्या बोलीभाषा… आपल्या लोककला …लोकसंगीत… हस्तकला जगल्या पाहिजेत आणि सांस्कृतिक वारसा पुढे चालला पाहिजे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे आणि अशा कार्यक्रमातून नक्कीच चालना मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी वनरंग आदिवासी संस्कृतीचा गौरव कार्यक्रमाचे आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजन केले होते. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

आदिवासी समाजाने देशातील जंगलांचे रक्षण केले… जलस्रोत जपले… जैवविविधतेचे रक्षण केले… आणि माणसाला निसर्गाशी सुसंवादाने जगण्याची शिकवण दिली. वातावरण बदल… ग्लोबल वॉर्मिग याबाबतचा जीवनमंत्र आदिवासी समाज शेकडो वर्षांपासून जगत आलेला आहे. म्हणूनच आदिवासी समाज हा केवळ विकासाचा लाभार्थीच नाही तर विकासाला दिशा देणारा समाज आहे असे ठाम मत सुनेत्रा अजित पवार यांनी मांडले.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे योगदान अतिशय मोठे आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी देशवासियांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. राणी दुर्गावती यांनी शौर्याचा आदर्श घालून दिला तसेच महाराष्ट्राचे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांनी अन्यायाविरुद्ध लढा उभारला या सर्वांचाच इतिहास हा भारताच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे असेही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

महायुती सरकारने आदिवासी समाजाच्या विकासासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आदरणीय अजितदादांनी नेहमीच आदिवासी समाजाच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे. अजितदादांनी आदिवासी समाजाच्या विकासकामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. यावरूनच अजितदादांचा आदिवासी समाजाबद्दलचा ओढा आणि काळजी किती होती हे स्पष्ट होते असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

आम्ही आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा या सर्वच क्षेत्रामध्ये काम करत आहोत आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळांचे आधुनिकीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, ई-लर्निंग सुविधा, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी विशेष योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वसतीगृह आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आणि पक्षाच्यावतीने आदिवासी समाजासाठी असणाऱ्या सर्व योजना प्रत्येक गावात… तालुक्यात पोचविण्याची आवश्यकता आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

वनहक्क कायद्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हक्क मिळावेत… आदिवासी बांधवांचे उत्पन्न वाढवावे… लघू उद्योगांना प्रोत्साहन मिळावे आणि दुर्गम भागात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा पोचवाव्यात यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे हेही सुनेत्रा पवार यांनी आवर्जून सांगितले.

वनरंग हा तीन दिवस चालणारा निव्वळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर हा आपल्या परंपरेचा… हा आपल्या भावनांचा… आपल्या अस्मितेचा उत्सव आहे. आपल्या लोकनृत्यामध्ये निसर्गाचे स्पंदन आहे. एक लय आहे… आपल्या गाण्यात जीवनाचा आनंद आहे…अशा शब्दात आपली भावना व्यक्त केली.

 

आदिवासी बांधवांमध्ये अमाप क्षमता आहे. शिक्षण, प्रशासन, क्रिडा, उद्योग, संशोधन आणि कला तसेच विज्ञान या प्रत्येक क्षेत्रामध्ये आदिवासी समाजातील युवक, युवती उल्लेखनीय काम करत आहेत. गेल्याच आठवड्यात नाशिक जिल्ह्य़ातील दिलीप गावित याने ग्लास्कोत झालेल्या क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे ही माहितीही यावेळी सुनेत्रा पवार यांनी सांगितली.

या वनरंग कार्यक्रमात आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती… पारंपारिक संगीत… लोकनृत्य लोककला… हस्तकला आणि अस्सल खाद्य संस्कृतीचा स्वाद घेण्यासाठी अनोखी संधी आपल्याला मिळणार आहे. तरी मुंबईकरांनी वनरंग उत्सवात सहभागी व्हा आपल्या आदिवासी बांधवांच्या परंपरा, कला, संस्कृती आणि जीवनमूल्यांना अधिक जवळून त्यांना जाणून घ्या… त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्या असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.

विविधतेत एकता हीच आपल्या भारताची खरी ताकद आहे. सर्व समाजघटकांनी हातात हात घालून परस्परांचा आदर राखून आणि एकमेकांकडून शिकत पुढे जाणे हीच आपल्या विकसित भारताची… विकसित महाराष्ट्राची वाट आहे. वनरंग हा उत्सव सामाजिक सलोखा… सांस्कृतिक जतन आणि सर्वसमावेशक विकासाला नवीन प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

 

आदिवासी जीवन कसे असते याचे चित्रण सादर केले त्यांचे वक्तृत्व आणि कौशल्य बघूनच आणि आदिवासी समाजाचा माणूस हा आदिवासी समाजाचा असतो परंतु नरहरी झिरवाळ यांच्यातील गुण हेरुन आदरणीय दादांनी त्यांना दुसरे खाते दिले अशा नरहरी झिरवाळ यांनी अशा चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल त्यांचे सुनेत्रा पवार यांनी कौतुक केले.

 

वनरंग कार्यक्रमात जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीचे… निसर्गाशी अखंड नातं जपणाऱ्या जीवनपद्धतीवर आणि आपल्या सांस्कृतिक वैभवाला खऱ्या अर्थाने अभिवादन करणार आहोत असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

या वनरंग उत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here