*धर्माच्या बंधनात अडकवून बहुजन ओबीसी समाजाला दिशाहीन करण्याचे षड्यंत्र,त्यांचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न झाला तर रस्त्यावर उतरू काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा*
*चंद्रपुरात मंडल यात्रेचा समारोप, आरक्षण, जातनिहाय जनगणना आणि सामाजिक न्यायासाठी निर्णायक लढ्याचा एल्गार*
चंद्रपूर, दि.९ : धर्म आणि भावनेच्या राजकारणात बहुजन ओबीसी समाजाला अडकवून त्यांचे खरे प्रश्न दडपण्याचे षड्यंत्र सुरू आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा संधी नाहीत, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे आणि ओबीसींच्या आरक्षणासह संविधानिक हक्कांवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. अशा परिस्थितीत बहुजन-ओबीसी समाजाने भावनिक राजकारणाला बळी न पडता आपल्या हक्कांसाठी निर्णायक संघर्ष उभारला पाहिजे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
चंद्रपूर येथे आयोजित ओबीसी मंडल यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. भंडारा येथून सुरू झालेल्या या यात्रेदरम्यान ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर व्यापक जनजागृती करण्यात आली. मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या अधिकाराचे संरक्षण, जातनिहाय जनगणना, शिक्षणातील संधी, रोजगारातील प्रतिनिधित्व, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण तसेच ओबीसी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या प्रश्नांवर यात्रेदरम्यान विशेष भर देण्यात आला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, बहुजन समाजाच्या हातात सत्ता, शिक्षण आणि आर्थिक सक्षमतेची साधने आली तरच सामाजिक परिवर्तनाला खऱ्या अर्थाने गती मिळेल. मात्र, बहुजनांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होऊ नये, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव होऊ नये आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारू नये, यासाठी भावनिक मुद्द्यांचा आधार घेतला जात आहे.
धर्म हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. मात्र, धर्माच्या नावावर राजकारण करून जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बगल देणे योग्य नाही. आज बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचा वाढता खर्च, शेतकऱ्यांच्या समस्या, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आणि आरक्षणाचे प्रश्न गंभीर आहेत. या प्रश्नांवर ठोस उत्तर देण्याऐवजी समाजाला धर्माच्या चौकटीत अडकवून दिशाहीन करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याला बहुजन समाजाने ठामपणे विरोध केला पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
मंडल आयोगाने ओबीसी समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाची दखल घेत त्यांना प्रतिनिधित्वाचा मार्ग खुला करून दिला. अनेक पिढ्यांपासून वंचित राहिलेल्या समाजघटकांना शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळवून देण्यात आरक्षणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मंडल आयोग हा केवळ एका समाजाचा विषय नसून सामाजिक न्यायाच्या लढ्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
मंडलने दिलेले अधिकार सहजासहजी मिळालेले नाहीत. त्यासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत लढत राहतील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व आणि विकासाच्या योजनांमध्ये न्याय्य वाटा मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे असल्याचेही आ. वडेट्टीवार यांनी नमूद केले.
बहुजन-ओबीसी समाजाने आता जागे झाले पाहिजे. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, आरक्षणासाठी आणि भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी संघर्ष केला पाहिजे. हक्क मागून मिळत नसतील, तर ते लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून मिळवावे लागतील. बहुजनांच्या न्याय्य हक्कांसाठीचा हा संघर्ष कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही. ओबीसींचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारू, असा इशाराही आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला.
समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या प्रभावी वकृत्वशैलीत सरकारच्या बहुजनविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. बहुजन समाजाने एकजूट आणि संघटित शक्तीच्या बळावर आपल्या हक्कांसाठी संघर्ष उभारावा, असे आवाहन त्यांनी केले.
या समारोपीय कार्यक्रमास पदवीधर शिक्षक आमदार अभिजित वंजारी, प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे, मंडल यात्रा संयोजक उमेश कोराम, काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर, विनायक बांगडे, अनिल डहाके, ॲड. विलास माथनकर, विजय टोंगे, उपमहापौर प्रशांत दानव, नंदू नगरकर, ॲड. सातपुते, बाळाभाऊ खोब्रागडे, दीप्ती सोनटक्के, प्रवीण पडवेकर तसेच ओबीसी मंडल यात्रेतील सर्व कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



















