Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *”छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” प्रभावीपणे राबवा; महिलांपर्यंत आणि वंचित...

*”छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” प्रभावीपणे राबवा; महिलांपर्यंत आणि वंचित घटकांपर्यंत सर्व योजनांचा लाभ पोहोचवा – आ.डॉ. नीलम गोऱ्हे* यांच्या सातारा जिल्हा प्रशासन सूचना

29
0

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री कै.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” अंतर्गत सातारा येथे जिल्हास्तरीय पूर्वतयारी आढावा बैठक विधान परिषद सदस्या तथा जिल्हा प्रभारी माजी उपसभापती आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानाची घोषणा केली असून, राज्यातील विधान परिषद सदस्यांना जिल्हानिहाय प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर राबविण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. संतोष पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी विठ्ठल इमानदार, निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी जिवंत सातबारा, प्रलंबित फेरफार, वारस नोंदी, भूसंपादन, आधार-रेशन कार्ड, कृषी व पशुसंवर्धन सेवा, आरोग्य, महिला व बालविकास तसेच शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. हे अभियान केवळ महसूल विषयांपुरते मर्यादित न ठेवता शासनाच्या सर्व लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी निर्देश दिले.

महिलांची विवाह नोंदणी, महिला शेतकरी सक्षमीकरण कायद्याबाबत जनजागृती, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे, एकल महिला, भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिला आणि अनाथ मुला-मुलींना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे का, याची विशेष पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबतही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर त्यांनी भर दिला.

अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात सुमारे ९.६४ लाख शेतकरी नोंदी, जिवंत सातबारा, फार्मर आयडी, लक्ष्मी मुक्ती योजनेसह ४२ हून अधिक शासन योजनांचा लाभ एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याची माहिती दिली.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी प्रत्येक शिबिराचे नियमित मूल्यमापन करून हे अभियान अधिक लोकाभिमुख, परिणामकारक आणि सर्वसमावेशक करण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here