कोकण : मुंबई पासून मालवण पर्यंतचा निसर्ग
जपणं आवश्यक आहे*
जसा शरीरात समतोल हवा, तसाच विकासातही समतोल हवा
रत्नागिरीच्या दापोलीतल्या आसूद आणि खेडच्या वाड्यांमध्ये डोंगराला भेगा पडल्या. रघुवीर घाट खचला. ५ घरं मातीखाली गेली. ६ कुटुंबं उघड्यावर आली.
ही फक्त नैसर्गिक आपत्ती नाही. ही धोक्याची घंटा मुंबईपासून मालवण पर्यंतच्या संपूर्ण कोकणासाठी आहे. आणि हीच घंटा मुंबईसाठीही आहे.
जगण्यासाठी शरीरातील पांढर्या पेशी जास्त वाढून चालत नाहीत. लाल रक्त पेशी योग्य प्रमाणात हव्यात. तद्वतच आपण राहतो तो परिसर असावा समतोल.
सिमेंट, काच, एसी या पांढर्या पेशी वाढल्या. झाडं, पाणी, माती या लाल पेशी कमी झाल्या. मग शरीर आजारी पडतं. मग शहर आजारी पडतं. मग कोकण आजारी पडतं…विचार करायला वेळ काढा. जशी अनिर्बंध अभिव्यक्ती चुक, तसाच अनिर्बंध विकास, बांधकाम, सिमेंटीकरण चुक.
आपण आजवर विकासाची व्याख्या चुकवली. विकास म्हणजे डोंगर कापून रिसॉर्ट बांधणं. विकास म्हणजे झाडं तोडून फ्लॅट उभारणे. पण कोकणाने १९ जुलैला उत्तर दिलं. हा विकास नाही. हा आत्मघात आहे. हो आत्मघातच!
प्रत्येक ठिकाणी जमीन- जल संवर्धन अतिशय आवश्यक आहे. मुंबईतही. कोकणातही. गावठाणातही. कोळीवाड्यातही.
जमीन म्हणजे फक्त प्लॉट नाही. जमीन म्हणजे पाणी मुरण्याची जागा आहे. झाडं उगवण्याची जागा आहे. माणूस जगण्याचा तो अधिकार आहे.
मुंबई ७ बेटांची सोबत वाढीव उपनगर झाली मुंबई म्हणजे समुद्राने वेढलेली ७ बेटं.
पण यावर आणखी किती न कशाप्रकारे अतिक्रमण करणार?
खाडी बुजवली. खारफुटी तोडली. डोंगर कापले. समुद्रात रस्ते घातले.
लोकसंख्या वाढली मान्य. पण मोठ्या इमारतींना, मॉल्सना, मेट्रोला, भुयारी रोडला मर्यादा हवी.
जमिनीला मर्यादा आहे. पाण्याला मर्यादा आहे. हवेला मर्यादा आहे. यावर आपण अनिर्बंध विकास नावाचा बुलडोझर फिरवतोय. आपण आता तरी सुधारायला हवं.
नाहीतर मुंबईही बुडेल आणि कोकणही उध्वस्त होईल.
●काचकाम, एसी घातकच●
आजचा नवा ट्रेंड सगळीकडे काच. सगळीकडे एसी. उन्हात काच तापते. एसी बाहेर गरम हवा फेकतो. आत थंड, बाहेर आगीचा भडका.
काचकाम एसी घातकच आहे. हे मुंबईला तापवतं. कोकणालाही तापवतं. पंचतत्वांचा समतोल बिघडवतं.
कोणत्याही प्रकारे निसर्गास आणि पंचतत्वास धक्का लागता कामा नये. पृथ्वी, पाणी, आग, वारा, आकाश यांच्याशी खेळलं की निसर्गाची घंटा वाजतेच.माणूस तर अगदीच छोटा या सगळ्यापुढे.
कोकणातल्या जमिनी बाहेरचे लोक येऊन घेतात. हा सर्वात मोठा धोका आहे.
विकासाच्या नावाखाली बाहेरचे येतात. स्वस्तात जमीन घेतात. रिसॉर्ट बांधतात. गेट लावतात. आणि मुळ कोकणवासी बघत बसतो.
यावर काही बंधन असायलाच हवे. शेतीची जमीन, गावठाण, कोळीवाडा यावर कायद्याची कवच हवी.
नाहीतर १० वर्षांनी कोकणात कोकणवासीच राहणार नाही.
गावं पण नेटकी मजबुत असावीत.
पावसात रस्ते बंद, वीज बंद, पाणी बंद. ही नेटकी गावं नाहीत. ही तात्पुरती वसाहत आहे.
गावाला मजबूत रस्ता हवा. निचरा हवा. पाणी मुरवण्याची जागा हवी.
गाव म्हणजे फक्त घरं नाहीत. गाव म्हणजे माणसं, संस्कृती, वारसा आहे. हे लक्षात घेणं गरजेचे आहे.
●गृह उद्योग हा कोकणाचा खरा कणा आहे.●
विकास म्हणजे बाहेरची कंपनी येऊन जमीन घेणे नाही.तर
विकास म्हणजे घराघरातून उत्पादन सुरु होणे.
घरातल्या आजीचा मसाला, पापड, आमरस, फणसाचा गर, काजू, कोकम, कोळंबीचे सांडगे.
*Made in Konkan* हीच खरी ब्रँड व्हॅल्यू आहे.
गृह उद्योगाला बँकेची मदत हवी. बाजारपेठ हवी. पण जमीन काढून घेऊन नाही. झाडं तोडून नाही.
माणसाला त्याच्या घरातच रोजगार हवा.
पर्यटन स्टारवालं नको. पर्यटन गावरान आणि निसर्गासह हवे.
५ स्टार रिसॉर्टसाठी डोंगर कापू नका. समुद्र किनारा कॉंक्रिट करू नका.
पर्यटकाला हवं आहे गावच्या चुलीवरची भाकरी. आंब्याच्या झाडाखालची झोप. नदीच्या काठावरची शांतता. कोळीवाड्यातली माणुसकी.
पर्यटन म्हणजे घरातल्या २ खोल्या पर्यटकाला देणे. घरचं जेवण देणे. गाव दाखवणे. कातळशिल्प दाखवणे.
स्टार हॉटेल नको. गावरान आदरातिथ्य हवे. निसर्गासोबतचा अनुभव हवा.
म्हणजे पर्यटक येईल, पैसा गावात राहील, आणि निसर्गही वाचेल.
कोळीवाडे, गावठाण आणि जगण्याचा अधिकार.
समुद्र किनारी कोळीवाडे संकुचित होतायत. गावठाणातल्या पिढ्यानुपिढ्यांच्या घरांवर बुलडोझर येतोय.
मुळ मुंबईकर, मुळ कोकणवासी यांना त्यांच्याच भूमीत परकं केलं जातंय.
विकास म्हणजे कोळ्याला मासेमारीचा हक्क.
विकास म्हणजे शेतकऱ्याला शेतीचा हक्क.
विकास म्हणजे प्रत्येकाला त्याच्या जमिनीवर जगण्याचा हक्क.
इमले माड्या नकोत. माडांची झाडांची विपुलता असावी.
विकास म्हणजे २० मजली इमारत नाही. विकास म्हणजे दारात माड. अंगणात आंबा. बांधावर नारळ. शेतात काजू.
इमले माड्या नकोत. माडांची झाडांची विपुलता असावी.
कारण झाडं पाणी मुरवतात. डोंगर धरतात. वारा देतात. ऑक्सिजन देतात. इमले फक्त सावट देतात आणि भूस्खलन देतात.
●कोरोना काळासारखी अवस्था नको.● पाऊस आला की मुंबईत रस्ते बंद. कोकणात गावं बंद. माणूस घरात कैदी.
हवा आहे असा विकास ज्यात पाऊस आला तरी शाळा सुरु राहील. रुग्ण दवाखान्यात पोहोचेल. माल बाजारात जाईल.
शेवटचं सत्य.
अभिव्यक्तीला जशी संविधानाची चौकट आहे, तशीच विकासालाही निसर्गाची चौकट हवी.
इमले २० वर्षात पडतात. पण एक माड १०० वर्षे सावली देतो. फळ देतो. जीव देतो.
जमीन गेली तर इतिहास जातो. जमीन गेली तर भाषा जाते. जमीन गेली तर कोकण जातं.
मोठे इमले पडतात. पण मुंबई पासून मालवण पर्यंतची जपलेली जमीन आणि पंचतत्व पिढ्यानुपिढ्या टिकतात.म्हणूनच
कोकण : मुंबई पासून मालवण पर्यंत मोठा निसर्ग रम्य परिसर आहे तसाच जपणं आवश्यक आहे.
कोकणातल्या जमिनीवर कोकणवासीयांचाच पहिला हक्क आहे.गृह उद्योग वाढवणे. गावरान पर्यटन वाढवणे महत्त्वाचे आहे.
मोठे. इमले नकोत. माडांची, कोकम काजु औषधी झाडांची गावरान मेव्यांची विपुलता असावी.
माणसांचे आणि निसर्गाचे जगण्याचे सर्व अधिकार जपणे हाच खरा विकास आहे. नाहीतर तो सर्वांना जागा दाखवेल
—
`



















