Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याच्या पाठीशी तिच्या आईचे संस्कार… तिची प्रार्थना आणि तिचे...

*प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याच्या पाठीशी तिच्या आईचे संस्कार… तिची प्रार्थना आणि तिचे अथक कष्ट उभे असतात – सुनेत्रा पवार*

36
0

*मातांचा सन्मान करणाऱ्या प्रमोद हिंदूराव यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मानले आभार…*

 

ठाणे – मुरबाड दि. ११ जुलै – ज्यांनी स्वतः च्या कष्टाने… त्यागाने आणि संस्कारांनी आपल्या मुलामुलींना घडविले… त्यांना शिक्षण दिलं… संघर्ष करण्याची ताकद दिली आणि समाजात कर्तृत्व सिद्ध करण्याची प्रेरणा दिली… प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याच्या पाठीशी तिच्या आईचे संस्कार… तिची प्रार्थना आणि तिचे अथक कष्ट उभे असतात… अशा प्रत्येक मातेला आजच्या आई महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी वंदन केले.

दरम्यान मातांचा सन्मान करणाऱ्या प्रमोद हिंदूराव यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आई महोत्सवात आभार मानले.

 

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!.. आई खरंच काय असते? हा सर्वांना पडलेला प्रश्न असतो पण… आई म्हणजे लेकराची माय असते… वासराची गाय असते… धरणीची ठाय असते… आई असते जन्माची शिदोरी… सरतही नाही, उरतही नाही…’ ही कविवर्य फ. मु. शिंदे यांच्या कवितेच्या ओळी ऐकवून दाखवल्या…

एखाद्या व्यक्तीच्या यशामागे अनेकांचा वाटा असतो पण त्या यशाचा सर्वात मोठा पाया जर कोणी रचत असेल तर ती म्हणजे आई… आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतः च्या सुख-दुःखाचा विचार न करता आयुष्यभर झटणाऱ्या अशा मातृशक्तीचा गौरव करणं ही केवळ औपचारिकता नसून समाजाचं कर्तव्य आहे असेही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे. त्यांच्या यशामागे त्यांच्या अथक परिश्रमाबरोबरच आईवडिलांचे संस्कार… शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा त्याग आहे. विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे भविष्यातील महाराष्ट्राचा सन्मान आहे असेही सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच समाजातील सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. महिला, शेतकरी, विद्यार्थी, युवक, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक अशा प्रत्येक घटकाचा विकास हेच ध्येय राहिले आहे असेही सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान आजच्या कार्यक्रमात करण्यात आलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे नक्कीच प्रयत्न करणार असल्याचा शब्द सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिला.

दादांनंतर पक्षाचे काय होणार अशा बातम्या वर्तमानपत्रात आल्या पण वहिनींनी दादांच्या कामाचा घेतलेला वसा इतका जबरदस्त आहे की त्याची काळजी कुणी करु नये अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी टिकाकारांना सुनावले.

दादा मुख्यमंत्री झाले नाहीत ते काळाला मान्य झाले नाही पण आता वहिनींच्या रुपाने मुख्यमंत्री होतील. हे काळाला मान्य करावे लागेल असेही प्रमोद हिंदूराव म्हणाले.

आमचा पक्ष वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. महायुतीमध्ये राहून सहकार्य करतोय परंतु महायुतीच्या घटक पक्षाकडून ठाणे जिल्हयात चांगले सहकार्य मिळत नाही अशी खंतही प्रमोद हिंदूराव यांनी व्यक्त केली.

दरम्यान याठिकाणी टेक्स्टाईल पार्क व्हावे अशी आमची मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी वहिनींनी प्रयत्न करावेत शिवाय स्टेडियमला मान्यता द्यावी. दादांच्या नावाने मार्शल आर्ट अकॅडमी स्थापन करणार आहोत असेही प्रमोद हिंदूराव यांनी सांगितले.

आमदार दौलत दरोडा, मातृशक्ती गौरव समितीच्या अध्यक्षा ज्योती हिंदूराव, जिल्हाअध्यक्ष किसनराव तारमळे यांनीही आपले विचार मांडले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा, आईंचा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

याअगोदर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बदलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कॅ. आशिष दामले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाणे जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर बदलापूरमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी बदलापूरच्या उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले व बदलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मुरबाड येथे प्रतिक हिंदूराव यांच्या कार्यालयाचे उद्घाटनही सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

कार्यक्रमात प्रमोद हिंदूराव आणि ज्योती हिंदूराव यांच्यावतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मानपत्र, संविधान भेट देऊन सन्मान करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्ह्याच्यावतीने ‘आई महोत्सव – २०२६’ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्यक्रम आज मुरबाड येथे आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शहापूरचे आमदार दौलत दरोडा, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, ज्योती हिंदूराव, ठाणे ग्रामीण जिल्हाअध्यक्ष किसनराव तारमळे, ठाणे ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष प्रतिक हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस संजय तिवरे, ठाणे ग्रामीण सरचिटणीस प्रशांत एगडे, सदामामा पाटील, विजय पाटील आदींसह मुरबाड तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here