Home मुंबई *अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कार्यरत*

*अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कार्यरत*

31
0

*रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert)*

*आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे; समुद्रकिनारी जाणे टाळावे*

*बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन*

बृहन्मुंबई क्षेत्रात सुरू असलेल्या अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. महानगरपालिकेचे १० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी विविध भागांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रावर तैनात असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती उपाययोजना करत आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून काही रस्त्यांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) दिला असून आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मुंबई महानगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला आज भेट दिली. तसेच, मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला आज (दिनांक ४ जुलै २०२६) भेट दिली आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्‍यान, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून महानगरपालिका आयुक्‍त श्रीमती अश्विनी भिडे या सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच, आवश्‍यक ते निर्देश देत आहेत. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्‍य) शरद उघडे , संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) रश्मी लोखंडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित आहेत.

दिनांक ४ जुलै २०२६ रोजी सकाळपासून मुंबई शहर व उपनगरांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्‍यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील सर्व खासगी / सरकारी शाळा व महाविद्यालयांना आज, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी दुपारच्या सत्रात सुटी जाहीर करण्यात आली आहे.

पश्चिम उपनगरात कोसळणा-या मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून, मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नालेही भरून वाहत आहेत. परिणामी, परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत आहे.

या पार्श्वभूमीवर, चेंबूर येथील नूर-ए-इलाही सेवा रस्ता, अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी येथील हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन तसेच परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले होते. पर्यायी मार्गांचा अवलंब करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले होते.

सर्व परिमंडळ उपायुक्‍त आणि सर्व सहायक आयुक्त (प्रभाग अधिकारी) तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांनी कार्यालयात किंवा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहावे. उप आयुक्तांनी याबाबत स्वतः खातरजमा करावी, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. या निर्देशांनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सतर्कतेवर असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. सर्व विभागप्रमुख, अभियंते, पंपचालक, आरोग्य कर्मचारी तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. सध्या तब्बल १० हजार कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात कार्यरत असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती उपाययोजना करत आहेत.

महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तत्काळ नोंद घेऊन त्या संबंधित विभागांकडे तातडीने कार्यवाहीसाठी पाठविण्यात येत आहेत. पर्जन्य जलवाहिनी व्यवस्था, सांडपाणी व्यवस्था आणि उदंचन केंद्रांच्या कार्यक्षमतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत राहावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत असून, पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा तरंगता घनकचरा, झाडांच्या फांद्या तसेच इतर कचरा मनुष्यप्रवेशिका (मॅनहोल) किंवा नाल्यांमध्ये अडकून पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कर्मचारी सातत्याने सेवा बजावत आहेत. भर पावसातही परिसर स्वच्छ राहावा, दुर्गंधी निर्माण होऊ नये आणि मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा अहोरात्र कार्यरत असून, सर्व संबंधित कर्मचारी समन्वयाने आवश्यक उपाययोजना करत आहेत.

सध्या सुरू असलेल्या पावसाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लेप्टोस्पायरोसिस या आजाराच्या प्रतिबंधासाठी आवश्यक ती खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे. महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनीदेखील लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक औषध म्हणून डॉक्सीसायक्लिन २०० मिग्रॅ (Doxycycline 200 mg) घ्यावे. या गोळ्या महानगरपालिका दवाखाना / डिस्पेन्सरीमधून उपलब्ध आहेत, असेदेखील महानगरपालिकेमार्फत नमूद करण्‍यात येत आहे.

मुंबई महानगरातील पाणी साचण्याची शक्यता असलेल्या (Flooding Spots) सर्व ठिकाणी पावसाच्या पाण्याचा जलद निचरा सुनिश्चित करण्यासाठी ४४८ उदंचन संच कार्यान्वित करण्यात आले आहेत. या उदंचन संचांचे अखंडित संचालन सुनिश्चित करण्यासाठी प्रशिक्षित पंपचालक प्रत्यक्ष ठिकाणी तैनात असून, परिस्थितीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर १९ छोटे उदंचन केंद्र कार्यान्वित आहेत.

भारतीय हवामान विभागाने रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनाही आवश्यक नसल्यास पावसादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, पाणी साचलेल्या रस्त्यांवरून अथवा उघड्या नाल्यांच्या परिसरातून जाणे टाळावे, विद्युत खांब, तुटलेल्या तारा किंवा धोकादायक झाडांच्या परिसरापासून दूर राहावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती अथवा धोका निदर्शनास आल्यास तात्काळ महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष अथवा संबंधित विभाग (वॉर्ड) कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here