Home मुंबई *चेंबूर दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा*

*चेंबूर दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा*

33
0

*आरक्षण उपवर्गीकरणावर मुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चेतून योग्य मार्ग काढू*

*आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या सदस्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट*

मुंबई, ता. ३० : चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून काही विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेची उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने आणि योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
शिंदे म्हणाले, “मी आत्ताच राहुल शेवाळे आणि आमदार काते यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. ते घटनास्थळी उपस्थित आहेत. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित डॉक्टरांशी बोलून मुलांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत तसेच त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.”

पावसाळ्यात अशा घटना टाळण्यासाठी झाडांच्या फांद्यांची छाटणी वेळेत होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी झाली होती का, याची माहिती घेतली जाईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या जातील,” असे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने शिंदे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात रिपब्लिक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलप, राजकुमार बडोले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या मोर्चानंतर विविध मागण्या आणि सूचना शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “या विषयाची सखोल माहिती घेणे आवश्यक आहे. प्रत्येक समाजाची लोकसंख्या, त्यांना मिळणारे लाभ आणि सर्व बाबींचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. महायुती सरकार कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. सर्व समाजांना न्याय मिळेल, ही सरकारची स्पष्ट भूमिका आहे.”

ते पुढे म्हणाले, “आज सुमारे २५ आमदारांनीही या विषयावर माझी भेट घेतली. मी आनंदराज आंबेडकर, बबनराव घोलप आणि राजकुमार बडोले यांना सांगितले आहे की, उद्याच मुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल. कोणताही प्रश्न किंवा समस्या चर्चेतून सोडवली जाईल. यापूर्वीही अनेक प्रश्न चर्चेच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. कोणावरही अन्याय होणार नाही आणि न्याय्य निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here