Home मुंबई *नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वेसाठी आता मुख्यमंत्री स्तरावर निर्णायक हालचाली; आमदार सत्यजीत तांबे बैठकीत...

*नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वेसाठी आता मुख्यमंत्री स्तरावर निर्णायक हालचाली; आमदार सत्यजीत तांबे बैठकीत सहभागी*

60
0

*१ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाकडून भेट; त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्याचा निर्णय*

मुंबई, दि. ३० जून २०२६ : नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्री स्तरावर हालचाली गतिमान झाल्या असून, या संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीस आमदार माणिकराव कोकाटे, शिवाजी आढळराव पाटील, शरद सोनवणे, विठ्ठल लंघे, सत्यजीत तांबे, अमोल खताळ, बाबाजी काळे, प्राजक्त तनपुरे, अक्षय कर्डिले यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे संयुक्त शिष्टमंडळ १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोन्ही रेल्वे प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वेमुळे उद्योग, व्यापार, शिक्षण आणि रोजगार क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. जनभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली केंद्राकडे सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या तीनही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत, तो लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित प्रयत्न करत असल्याचे नमूद केले.

राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वे मार्गासंदर्भातही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित अडचणी मुख्यमंत्री तसेच केंद्र सरकारपर्यंत पोहोचवून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालेले माजी मंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. जीएमआरटीशी संबंधित तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी केंद्राकडे अधिक प्रभावी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here