Home मुंबई *सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ –...

*सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*

30
0

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार सारथीच्या कार्यातून प्रत्यक्षात येत असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काढले.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनाच्या पार्श्वभूमीवर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केवळ विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक यशाचा नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याचा उत्सव आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, गुणवत्ता आणि कठोर परिश्रमाच्या बळावर विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामागे त्यांच्या पालकांचा त्याग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सारथीची भक्कम साथ आहे.

शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि उद्योजकता या सर्व क्षेत्रांत सारथीने उल्लेखनीय कामगिरी असल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या, संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष योगदान आहे.सारथीच्या प्रशासकीय मुख्यालयासह आठ विभागीय कार्यालये आणि प्रत्येकी ५०० विद्यार्थी व ५०० विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृह उभारणीसाठी १ हजार ३६० कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हजारो विद्यार्थ्यांसाठी संधीची नवी दालने खुली झाली.

स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सारथीने आजपर्यंत युपीएससीमध्ये १४० तर एमपीएससीमध्ये १ हजार २४५ अधिकारी घडविले असून विविध शासकीय सेवांमध्ये हजारो युवक-युवती कार्यरत आहेत. ही केवळ आकडेवारी नसून समाजाच्या आत्मविश्वासाचा आणि परिवर्तनाचा जिवंत पुरावा आहे. छत्रपती संभाजी महाराज सारथी व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून ग्रामीण भागातील युवक डिजिटल कौशल्याशी जोडले गेले आहेत. विविध शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण योजनाही प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले.

राज्य शासन युवकांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या प्रत्येक उपक्रमाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सारथीच्या सर्व योजनांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आजचा सन्मान हा प्रवासाचा शेवट नसून नव्या जबाबदारीची सुरुवात आहे. प्रशासनात कार्य करताना सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू ठेवून सेवा करावी. सारथीने घातलेल्या यशाच्या पायाचा अभिमान बाळगत भविष्यात संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here