Home Trending Now भारत विरुद्ध जपान: शिस्त विरुद्ध फुकटगिरी , AI च्या युगात कोण टिकणार?*...

भारत विरुद्ध जपान: शिस्त विरुद्ध फुकटगिरी , AI च्या युगात कोण टिकणार?* -*शीतल हरीश करदेकर | Maimedia24*

62
0

AI चा गाजावाजा खूप होतोय. जशी यंत्रांची शक्ती आली तशी माणसांची जागा घेतली गेली. पण त्यातही हस्तकला, मानवी शक्ती, मनुष्यबळ महत्त्वाचं आहेच. आता आला AI. TCS सारख्या कंपन्या हजारो नोकऱ्या संपवताहेत.

प्रश्न एकच आणि चिंतेचा – पुढे काय? ‘सरकार देईल’ म्हणून फुकटच्या रांगेत उभं राहायचं, की जपानसारखं ‘कामाने’ उत्तर द्यायचं? याचा विचार मंत्रालयापासून ते तळागाळातील श्रमिकांना करण्याची वेळ आलीय.

आणि याचं उत्तर शोधण्यासाठी जपान आणि भारताची तुलना करावी लागेल. कारण दोघांची वाट वेगळी आहे. समाजमाध्यमावर जपानचं कौतुक करणारे संदेश पसरवले जात आहेत. म्हणून ही तुलना करण्याची आणि आपल्याकडे सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.

*१. कामाची व्याख्या: कर्तव्य vs फुकटगिरी*
*जपान*: तिथे लहानपणापासून शिकवतात – “काम करा, नाहीतर गरजांशिवाय जगा.” शाळेत मुलं स्वतः वर्ग झाडतात. ट्रेन १० सेकंद लेट झाली तरी संबंधित लोक माफी मागतात. भूकंप आला तरी परिस्थितीचा गैरफायदा घेत दुकानं लुटत नाहीत. कारण तिथे *’कर्तव्य’ हा धर्म आहे.*

*भारत*: इथे निवडणूक आली की “फुकट वीज, फुकट बस, फुकट रेशन” च्या घोषणा. ‘हक्क’ मागण्यापेक्षा ‘भीक’ मागण्याची सवय लागलीय. AI मुळे नोकरी गेली की तरुणाई म्हणते “सरकार काहीतरी करेल”. कारण इथे *’फुकटगिरी’ ही सवय झालीय.* सुस्ती वाढलीय. म्हणूनच ‘कौन बनेगा करोडपती’ सारखा कार्यक्रम जोरात चालतो. त्यावर ‘स्लमडॉग मिलिनेअर’ सारखा सिनेमा निघून जागतिक पातळीवर पुरस्कारही मिळवतो.

*२. मालकाची भूमिका: सेन्सेई vs कंत्राटी मदारी*
*जपान*: कारखान्याचा मालक ‘सेन्सेई’ म्हणजे गुरू असतो. Toyota चे मालक कामगारांसोबत जेवतात. ‘Kaizen’ म्हणजे कामगाराला सोबत घेऊन सुधारणा. ‘Stop the Line’ चा अधिकार शेवटच्या कामगारालाही असतो. कारण त्यांना माहीतेय – *श्रमिक, कष्टकरी, घाम गाळणाराच सोनं घडवतो.*

*भारत*: इथे बहुसंख्य ‘कंत्राटी-मदारी-मालक’ आहेत. मालकाला AC केबिन, कामगाराला बसायला साधी खुर्ची नाही. ११ महिन्यांचे कंत्राट, PF नाही, “उद्यापासून येऊ नकोस” ही थेट धमकी किंवा काम जाण्याच्या भीतीची टांगती तलवार डोक्यावर ठेवलेली असतेच. कामगार म्हणजे ‘एक्सेल शीट’मधला नंबरच, असे मानणारे हे ‘मालक’ नाहीत, तर हे माणसं नाचवणारे मदारी आहेत. काय उपयोग सुधारित कामगार कायद्याचा? इथे कोणत्याही कामगाराची ओळख नाही. पत्रकारितेत तर ही परिस्थिती बिकट आहे. नाही किमान वेतन, नाही वेतन आयोग, साधी माध्यमात काम करणाऱ्या श्रमिकांची श्रेणी नाही, नोंद नाही. सगळा कंत्राटदारांचा मदारी कारभार!

*३. श्रमाची किंमत: शोकुनिन vs माकड*
*जपान*: सुतार, सफाई कामगाराला ‘शोकुनिन’ म्हणतात – ते कलाकार असतात. त्याच्या कामाला प्रतिष्ठा आहे. CEO आणि कामगार एकाच कँटीनमध्ये जेवतात. कारण तिथे *’श्रमाला इज्जत आहे.’*

*भारत*: इथे मालकाला वाटतं कामगार म्हणजे ‘मदाऱ्याचं माकड’ – आपण नाचवावं तसं नाचणारं. ८ तास राबूनही सुपरवायझरच्या शिव्या पडतात. म्हणूनच ते म्हणतात “मालकाने माझं काम काढून घेतलं”. *इथे घाम, श्रमिक महत्त्वाचे नाहीत, फक्त ‘कमी वेळेत पैशात ढासू’ हवंय सगळं.*

पण मालक म्हणवणारे एक विसरलेत. महाभारतात अर्जुनाच्या रथावर ‘कपिध्वज’ होता – म्हणजे हनुमंताचा झेंडा. कारण युद्ध निष्ठेने जिंकतात. *आजचा भारतीय कामगार, कष्टकरी मदाऱ्याचं माकड नाही. तो रामाचा हनुमान आहे.* ज्याच्याकडे शक्ती आहे, बुद्धी आहे, निष्ठा आहे. ज्या दिवशी त्याला कळेल की ‘आपली शेपटीच अहंकाराची लंका जाळू शकते’, त्या दिवशी कंत्राटी मदाऱ्यांचे ढोल फुटतील.

*४. मीडियाचा आरसा: शिंबुन vs पेड न्यूज*
*जपान*: ‘शिंबुन’ म्हणजे वृत्तपत्र! तिथे संपादकाला ‘समाजाचा शिक्षक’ मानतात. बातमी चुकली तर संपादक राजीनामा देतात. कारण *बातमी म्हणजे सामाजिक जबाबदारी असते.*

*भारत*: इथे ४ माणसांची कंपनी, बाहेरून पेपर करून घेऊन पाट्या टाकल्या जातात. ते समाजाचा आरसा कसे असतील? गरीबाला २०० रुपयात राबवून जाहिरातीचा पैसा गोळा करतात. सरकारच्या चुका दाखवल्या तर सरकारी नाराजीने जाहिरात बंद होणार याची चिंता. आणि म्हणूनच ‘मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नालेसफाई’ ही बातमी होते, पण गटार तुंबलंय ही महत्त्वाची वाटत नाही. ती असते कोपऱ्यात अडनिड ठिकाणी. *हे समाजाचे आरसे नाहीत, तर तडा गेलेले काच आहेत.* या अशा परिस्थितीत AI आले तर खूप काही बदलेल अशा भ्रमात बहुसंख्य जण आहेत.

*५. AI आला तर काय? रिस्किलिंग vs रडगाणं*
*जपान*: AI आला तेव्हा तिथे कुणी घाबरले नाहीत. या मूळ विषयावर उपचार काय यासाठी सरकार, कंपनी आणि कामगार एकत्र बसले. ‘रिस्किलिंग’ केलं. रोबोट आला, पण माणसांना काढलं नाही तर त्यांना रोबोट चालवायला शिकवलं. कारण तिथे *माणूस हा केंद्रस्थानी आहे.*

*भारत*: आपल्याकडे नवीन कामगार कायदे आले तरी सरकार, मालक, कामगार एकत्र बसले नाहीत. आता सुधारणा, सूचना मागवत आहेत. हे आधी का केले गेले नाही? हे कोण विचारणार? मीडियात तर तोंड उघडून बोलायचीही चोरी. बोललो तर ‘शहरी नक्षलवादी’ ठरवलं जाईल ही भीती! तर आपल्या भारतात AI आला की पहिला घाव कामगारावर. कारण ‘कंत्राटी मदारी’ मालकाला माणूस नकोय, सगळं सहज ‘ढासू’ हवंय. AI पगार मागत नाही, सुट्टी मागत नाही. मग जो कंत्राटी मालक आधीच माणसांच्या घामाची किंमत करत नाही, तो AI लावून माणसालाच पहिले हाकलणार.

*मग यावर उपाय काय? भारताने जपानकडून काय शिकायला हवं?*
१. *फुकटगिरी बंद, कर्तव्य सुरू*: भुकेल्याला १ वेळ जेवण द्यावे, पण ३ वेळचं कमवायचं स्किल पण द्यावे. फक्त ‘लाभार्थी’ नको, कामगारातील ‘कारागीर’ घडवावा.
२. *मदारी नको, सेन्सेई हवा*: मालकांनी कामगाराला ‘कुटुंब’ मानावं. कँटीन, टॉयलेट, इज्जत – सगळं समान हवं. ‘Owner’ नको, ‘Leader’ हवा.
३. *श्रमाला प्रतिष्ठा द्यावी*: ‘मिस्त्री’ला ‘इंजिनिअर’इतका मान द्या. ८ तास काम, डबल ओव्हरटाईम, PF सक्तीचा. कारण कंपनी मोडते तेव्हा AC वाचवत नाही, निष्ठावान कामगार ती वाचवतो.
४. *आधी आरसा स्वच्छ करा*: काही झालं की सगळेच राजकीय पक्ष, नेते ओरडतात. लोकशाही वाचवायला पत्रकारांवर अन्याय म्हणजे चौथ्या स्तंभावर अन्याय! पण आधी पत्रकाराला किमान वेतनानुसार पगार द्या. आरशावर ‘चरे’ नकोत. जाहिरात हवी, पण बातमी विकून नको. हुजरेगिरी करून मिळवलेल्या आर्थिक फायद्यात कसली आलीय इज्जत?

*आता शेवटचा प्रश्न हा की आपण यातले कोणाला निवडणार?*
जपानची ‘शिस्त’ की भारतातली ‘फुकटगिरी’?
सेन्सेई मालक की कंत्राटी मदारी?
शोकुनिन कामगार की मदाऱ्याचं माकड?

लक्षात ठेवा,
ज्या देशात श्रमिकाच्या घामाची किंमत नसते, तो देश फुकटच्या तुकड्यांवरच जगतो.
पण ज्या देशातला, राज्यातला कामगार *’धर्म नि कर्तव्यासाठी उभं रहातो’*, *तो देश किंवा राज्य हनुमंताच्या ताकदीने कोणतीही माजलेली लंका जाळू शकतो.*

एक मात्र नक्की की आपलेकडील श्रमिक व मीडियाकर्मी म्हणतील:
*”आम्ही मदाऱ्यांची माकडं नाही. आम्ही रामाचे हनुमान आहोत.”*
*”आम्ही बेकार कंत्राटी नाही. आम्ही कपिध्वज आहोत.”*
*सावधान! इथे शिस्तीचा आणि निष्ठेचा हिशोब होतो.*

मज नकोत अश्रू, घाम हवा… घामाला सन्मानाचा दाम आणि इज्जत हवी. ही श्रमिकांची भूमिका हवी आणि मालकांनी अहंकाराचा मुकूट उतरवून फेकून द्यावा. तर नक्कीचत कोणत्याही काळात श्रमिक व खऱ्या मालकीीला चिंता नसेल.

——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here