*जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली*
मुंबई, दि. २६ मे २०२६ : राज्यातील बंजारा / लमाण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या “संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजने” संदर्भात आज मंत्रालयात सादरीकरण व आढावा बैठक पार पडली. तांड्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणे तसेच विकास प्रक्रियेत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत राज्यातील विविध तांड्यांशी संबंधित नवीन प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, प्रलंबित प्रस्तावांतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करणे आणि आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना दिशा-निर्देश देण्यात आले. राज्यातील बंजारा / लमाण समाजाचा विकास अधिक गतीने व्हावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
राज्यातील सुमारे ५ हजार ५०० तांड्यांचा नियोजनबद्ध आणि टप्प्याटप्प्याने विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, तांड्यांची अचूक माहिती संकलित करण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यावर येत्या काळात भर देण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ तांड्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागीय स्तरावर समन्वय वाढविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
बंजारा / लमाण समाजातील अनेक तांडे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने त्यांना पुनर्वसित गावांच्या धर्तीवर पाणीपुरवठा, वीज, शाळा, अंगणवाडी, आरोग्य सुविधा, पथदिवे, गटारे आणि अंतर्गत रस्ते यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तांड्यांचा सर्वांगीण विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक स्थैर्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून प्रलंबित विषय तातडीने निकाली काढावेत, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख श्री. रामेश्वर नाईक तसेच ग्रामविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
000 00



















