मुंबई,
“सद्गुणांना शोभा यावी, विरोधकानेही अवाक होऊन पहावे आणि वैऱ्यानेही प्रेमात पडावे, असे व्यक्तिमत्त्व रवि मल्ल्या यांचे आहे”, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक विजय तारी यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या रवि मल्ल्या यांच्या नेतृत्वाखालील मल्ल्या वराडकर फ्रेंड्स क्लबची मुक्तकंठाने प्रशंसा केली. मल्ल्या वराडकर फ्रेंड्स क्लब बोरिवली तर्फे ६० वर्षावरील खेळाडूंसाठी बोरिवली येथील एम सी एफ जॉगर्स पार्क मैदानात रमाकांत राणे चषक मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
वयाची ७५ वर्षे ओलांडलेले क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ कवी विजय तारी यांनी श्रीफळ वाढवून केले. त्यांनी साठ वर्षांवरील सर्वच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात विजय तारी यांनी “नांदी संपल्यावर पडदा उघडला. तेंव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगीबेरंगी शब्दांनी शरीरभर रोडावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, भीतींनी, आशांनी व अपेक्षांनी. आणि भरतवाक्य संपल्यावर समोरचं प्रेक्षालय रितं झालंय. आणि संहितेत नसलेल्या प्रयाणांची तयारी करीत मी रंगमंचावर उभा आहे एकटा, समोरच्या प्रेक्षालयासारखा संपूर्ण रिकामा. अर्थात, माझे काही शब्द प्रेक्षालयातील धुसर मंद प्रकाशात पिंजारलेल्या कापसासारखे हवेत तरंगत आहेत अजूनही. माझे काही आविर्भाव प्रेक्षालयातील रिकाम्या खुर्च्यांना बिलगून बसले आहेत अजूनही. माझे काही हर्ष विमर्षाचे क्षण पावसाने फांदीवर टांगलेल्या थेंबासारखे भिंतीच्या कोपऱ्यावर थरथरताहेत अजूनही. बस्स तेवढा एकच दिलासा माझ्या मनाच्या रितेपणाला. नाटक संपलं याची तर खंत आहेच. नाटक नव्हे. तीन तासांचं अर्करुप अस्तित्व संपलंय, ते इथे माझ्याजवळ पण माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन आज हजारो प्रेक्षक घरी गेलेत आणि मी एक होतो तो अंशा अंशाने वाटला गेलोय. हजारो प्रेक्षकांच्या जीवनात कदाचित स्मरणातही” ही कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांची कविता खडानखडा म्हणून दाखविली आणि कार्यक्रमात रंगत आणली. या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला. बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय (बाबू) देसाई उपस्थित होते. या स्पर्धेत मल्ल्या वराडकर संघ विजेता ठरला व उपविजेता सोनीवाडी संघ ठरला. स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरिज नरेश नेत्रावळकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चंद्रशेखर साळुंखे, उत्कृष्ट यष्टीरक्षक संजय दादरकर ठरले. विशेष म्हणजे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई आणि स्वराज्यरक्षक संमाजी मालिकेतील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकार करणारे प्रख्यात अभिनेते अनिल गवस हे सुद्धा या क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते.*



















